Headlines

बॅलेट पेपरवरही महायुतीचीच मुसंडी, भाजपची उबाठावर टीका:नवनाथ बन यांनी टोरंट प्रकल्पाच्या विरोधामागील काँग्रेसच्या बैठकीचा गोपनीय फोटो केला उघड




“बॅलेट पेपरवर मतदान झाले की हुकूमशाहीचा पराभव होतो, अशा वल्गना करणाऱ्या संजय राऊतांनी आधी स्वतःच्या पक्षाची वाताहत पाहावी. बॅलेट पेपरवर निवडणुका होऊनही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 पैकी 3 जागांवर महायुतीच आघाडीवर आहे. पुण्यात उबाठा गटाच्या सुनील मोदींना अवघी 3,066 मते तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दिलीप घुगे यांना केवळ 8,000 मते मिळाली. हीच तुमची खरी राजकीय लायकी आणि पात्रता आहे. दुसऱ्याच्या घरात पोर झाले म्हणून पेढे वाटणे संजय राऊतांनी थांबवावे,” असा जोरदार हल्लाबोल भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी पदवीधर-शिक्षक निवडणुकीचे निकाल, टोरंट वीज प्रकल्पावरून सुरू असलेले षडयंत्र, कथित 500 कोटींची ऑडिओ क्लिप आणि शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या 5,000 रुपयांच्या दुष्काळी मदतीवरून विरोधकांना उघडे पाडले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात झालेला एक गोपनीय फोटो पत्रकार परिषदेत दाखवून खळबळजनक गौप्यस्फोट केला. बॅलेट पेपरवरही काँग्रेस-उबाठाचे पानिपत निवडणूक निकालांच्या आकडेवारीवरून नवनाथ बन यांनी विरोधकांचा समाचार घेतला. “संजय राऊत सकाळी सकाळी उठून आनंदाच्या उकळ्या फोडत आहेत. मात्र पुण्यात त्यांच्या उमेदवाराला अवघी 3,066 मते पडली, तर बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दिलीप घुगे यांना फक्त 8,000 मते मिळाली. संजय राऊतांना वाटले होते 1 लाख मते मिळतील. तिथेही मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले आहे.” पुणे व नागपुरात भाजप आघाडीवर “पुण्यात कौस्तुभ गावडे आघाडीवर आहेत. नागपूरमध्ये सुधाकर कोहळे पहिल्या पसंतीच्या (First Preference) मतांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा पुढे आहेत. त्यामुळे 5 पैकी 3 जागांवर महायुती भक्कमपणे पुढे असून जनमत महायुतीसोबतच असल्याचे स्पष्ट झाले आहे.” कर्नाटकातील पराभवावरून टोला “संजय राऊतांचे मालक राहुल गांधी आणि डी. के. शिवकुमार यांचे सरकार असलेल्या कर्नाटकातही शिक्षक-पदवीधर निवडणुका बॅलेट पेपरवरच झाल्या. तिथे 4 पैकी 3 जागांवर भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला, तर एनडीएने 4 पैकी 4 जागा जिंकल्या. तिकडे काँग्रेसचा धुव्वा उडाला, त्यावर राऊत का बोलत नाहीत?” संजय राऊतांना मोबाईल चालवता येत नाही, पण ते आधुनिक मटका किंग! संजय राऊतांच्या कार्यशैलीवर आणि विधानांवर सडकून टीका करताना बन म्हणाले, “संजय राऊत म्हणतात मला मोबाईल वापरता येत नाही. तंत्रज्ञान येत नसले तरी काल्पनिक आणि साय-फाय कथा रचण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. भांडुपच्या एका बाबू नावाच्या मटका किंगकडे राऊत लहानपणापासून आकडे लावायचे. ते आधुनिक मटका किंग असून त्यांनी स्वतःच्या पक्षाचा मटका लावून पक्ष रसातळाला नेला आहे.” शिक्षकांचा केला घोर अपमान “शिक्षकांनी 10,000 रुपयांना मते विकली, असा आरोप करून राऊतांनी महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांचा आणि पदवीधरांचा घोर अपमान केला आहे. या आधी लाडक्या बहिणींचा आणि शेतकऱ्यांचा अपमान केला, आता शिक्षकांना बदनाम करत आहेत. शिक्षक हा अपमान कधीही विसरणार नाहीत.” पत्राचाळ घोटाळ्याचे पैसे दुष्काळग्रस्तांना द्या “मुख्यमंत्र्यांना 10,000 रुपये देण्याच्या वल्गना करण्यापेक्षा कोविड काळात दररोज 100 कोटींची जी वसुली केली आणि पत्राचाळ घोटाळ्यात 1,000 कोटी रुपये हडपले, त्यातील 200 ते 500 कोटी रुपये मराठवाडा व विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावेत.” कर्जत प्रकल्पाविरोधात काँग्रेसचाच अजेंडा; टिळक भवनातील बैठकीचा फोटो केला उघड कर्जत येथील टोरंट पंप स्टोरेज प्रकल्पावरून सुरू असलेल्या राजकारणामागील पडद्यामागची रणनीती मांडताना त्यांनी एक फोटो माध्यमांसमोर दाखवला. “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईतील टिळक भवनात एक बैठक घेतली होती. या बैठकीचा फोटो समोर आला आहे. यात विनीत पाटील, हेमंत तोमरे, सृष्टी, अपूर्वा, सत्यजित चव्हाण, डॉ. मंगेश सावंत, दिनेश राणे, मिलिंद राऊत, स्वप्निल तरे, देवेंद्र तांडेल, दीपक पवार, उमेश तांडेल अशी मंडळी उपस्थित होती.” महाराष्ट्रातील सर्वच प्रकल्पांना विरोध “वाढवण बंदर, मुरबे प्रकल्प, तिसरी-चौथी मुंबई, बुलेट ट्रेन आणि अणूऊर्जा प्रकल्प या सर्वच विकासकामांना पर्यावरणवाद्यांचे नाव पुढे करून विरोध करायचा, असा कट काँग्रेसच्या या बैठकीत शिजला. बारसू रिफायनरी आणि मुंबई मेट्रो कारशेडला विरोध करणारी हीच 30 लोकांची इको-सिस्टीम आहे.” “महाराष्ट्रात पर्यावरणवादाचे तुणतुणे वाजवून प्रकल्पांची अडवणूक करायची आणि हे प्रकल्प काँग्रेसचे सरकार असलेल्या कर्नाटक किंवा तेलंगणामध्ये पळवून न्यायचे, असा कुटील डाव काँग्रेसचा आहे.” राज ठाकरेंना नम्र विनंती बन म्हणाले, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे समजूतदार नेते आहेत. कर्जतचा 3,000 मेगावॉटचा हा प्रकल्प कोळशापासून होणारे प्रदूषण रोखणारा आणि भावी पिढ्यांचे भविष्य घडवणारा स्वच्छ ऊर्जेचा प्रकल्प आहे. तिथे लवासा, फार्महाऊस किंवा स्वतःचे घर बांधले जात नसून डोंगराच्या माथ्यावर आणि पायथ्याशी जलसाठ्यांची तळी निर्माण केली जात आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या प्रकल्पाचे महत्त्व समजून घ्यावे आणि विरोध करू नये.” दीड कोटी शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत ही तात्पुरती दुष्काळी मदतीबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी विरोधकांना फटकारले. “देवेंद्र फडणवीस सरकारने पंचनामे होण्याआधीच राज्यातील तब्बल 1.5 कोटी (दीड कोटी) शेतकऱ्यांना प्रत्येकी 5,000 रुपयांची तातडीची मदत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जर सरकारने अटी-शर्ती लावल्या असत्या, तर 1.5 कोटी शेतकरी एकाच वेळी पात्र ठरले नसते.” दिवाळीपूर्वी आधार “ही 5,000 रुपयांची मदत केवळ दिवाळी गोड करण्यासाठी दिलेली तात्पुरती अग्रीम मदत आहे. प्रत्यक्ष पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार सर्व दुष्काळी सवलती आणि भरघोस नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल. यापूर्वी कोणत्याही सरकारने निवडणूक नसताना अशी धाडसी कर्जमाफी आणि थेट रोख मदत दिली नव्हती.” संजय राऊतांना एसआयटीवर विश्वास नाही मनोज जरांगे यांच्या कथित 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून सुरू असलेल्या एसआयटी चौकशीवर बोलताना बन म्हणाले, “सदर ऑडिओ क्लिप खरी आहे, खोटी आहे, एआय (AI) जनरेटेड आहे की विविध संवादांची मोडतोड करून बनवली आहे, हे एसआयटीच्या निष्पक्ष चौकशीतूनच समोर येईल.” पाकिस्तानातून नावे आणावीत “संजय राऊतांचा मुंबई पोलिसांवर किंवा कोणत्याही भारतीय यंत्रणेवर विश्वास नसेल, तर त्यांनी पाकिस्तान किंवा बांगलादेशमधील त्यांच्या आवडत्या लोकांची नावे एसआयटीसाठी द्यावीत, आम्ही मुख्यमंत्र्यांना ती नावे घेण्याची शिफारस करू. सामनाच्या कार्यालयात बसून खोट्या पटकथा लिहिणाऱ्यांचा पर्दाफाश लवकरच होईल,” असा घणाघात नवनाथ बन यांनी शेवटी केला. —————————————————————- हेही वाचा… खरगेंकडून चूक झालीच, पण शहांचे वक्तव्यही समर्थनीय नाही:पृथ्वीराज चव्हाणांचे परखड मत, म्हणाले- आम्ही वैचारिक विरोधक आहोत, एकमेकांचे जानी दुश्मन नाही! “राजकारणात कोणत्याही पक्षाचा नेता असो, संसदीय आणि सुसंस्कृत भाषेची मर्यादा कधीही ओलांडली जाऊ नये. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून नकळत चूक झाली असेल, ते त्याबाबत नक्कीच पक्षाची भूमिका स्पष्ट करतील. मात्र, त्याच वेळी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींबद्दल काय वक्तव्य केले होते, हेही सत्ताधाऱ्यांनी विसरू नये. भाषेच्या मर्यादेचे उल्लंघन दोन्ही बाजूंनी झाले असून, राजकीय नेते एकमेकांचे वैचारिक विरोधक असू शकतात, पण ‘जानी दुष्मन’ असू शकत नाहीत,” अशा शब्दांत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले परखड मत व्यक्त केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *