![]()
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मंगळवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू असलेली मतमोजणीची प्रक्रिया २४ तास उलटून गेल्यानंतरही अद्याप सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, येथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या अटीतटीच्या लढतीत शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी मजबूत आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पवार गटाच्या उमेदवाराला पडद्यामागून केलेली मदत निर्णायक ठरल्याचे चित्र मतमोजणीतून समोर येत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतील आकडेवारी काय सांगते? सध्या मतमोजणीची तिसरी फेरी सुरू असून, दुसऱ्या फेरीअखेरची अधिकृत आकडेवारी आणि तिसऱ्या फेरीचे प्राथमिक कल हाती आले आहेत: दुसऱ्या फेरीअखेर: शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील यांना ५४,०९५ मते, तर अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांना ४३,१६१ मते मिळाली आहेत. सोशल मीडिया स्टार रविराज साबळे यांनी १४,५९८ मते घेत लक्ष वेधून घेतले आहे, तर ठाकरे गटाचे दिलीप घुगे यांना ६,२१८ मते मिळाली आहेत. या फेरीत पाटील यांनी १०,९३४ मतांची भक्कम आघाडी घेतली. विशेष बाब म्हणजे, टपाल मतदानासह मोजलेल्या एकूण १ लाख ४० हजार ५४३ मतांपैकी तब्बल ११,७८३ मते अवैध (बाद) ठरली आहेत. तिसऱ्या फेरीचे प्राथमिक कल: प्राप्त माहितीनुसार, तिसऱ्या फेरीत प्रतापसिंह पाटील ७८,५४० मतांसह आघाडीवर असून, सतीश चव्हाण (५५,१८०) मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. येथे पाटील यांची आघाडी २३,६६० मतांवर पोहोचली आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार? सध्याचे कल पाहता कोणताही उमेदवार विजयाचा निश्चित ‘कोटा’ पूर्ण करेल, अशी शक्यता कमी दिसत आहे. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मोजणीनंतर, सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवारांना बाद करून त्यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागण्याची शक्यता आहे. जोपर्यंत विजयाचा कोटा पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया चालेल. त्यामुळे या मतदारसंघाचा अंतिम आणि अधिकृत निकाल आज दुपारनंतर किंवा संध्याकाळपर्यंतच स्पष्ट होऊ शकेल. ‘सत्तार फॅक्टर’ची राजकीय वर्तुळात चर्चा मराठवाडा पदवीधरच्या या निवडणुकीत अजित पवार गटाचे सतीश चव्हाण आणि शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील यांच्यात थेट लढत होती. मात्र, महायुतीत असूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी शरद पवार गटाच्या उमेदवाराला अप्रत्यक्षपणे मोठी ताकद दिली. सत्तारांची ही खेळी या निकालात स्पष्टपणे दिसत असून, यामुळेच सतीश चव्हाण पिछाडीवर पडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्या तरी विजयाचे पारडे प्रतापसिंह पाटील यांच्याच बाजूने झुकलेले दिसत आहे. —————– हेही वाचा.. मराठवाडा पदवीधरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील 13 हजार मतांनी आघाडीवर: पुणे शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीतून काँग्रेसचे जयंत आसंगावकर बाद महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांच्या मतमोजणीचे स्पष्ट चित्र अद्याप समोर आले नसले, तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. सविस्तर वाचा
Source link
मराठवाडा पदवीधरमध्ये 'सत्तार फॅक्टर' चालला?:24 तास उलटूनही चुरस कायम, सतीश चव्हाणांना मागे टाकत शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील विजयाच्या उंबरठ्यावर