![]()
यंदाचा पावसाळा वराड (ता. धरणगाव) परिसरासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कमालीचा चिंतेचा ठरला आहे. खरीप हंगामात अपेक्षित उत्पादन हाती न आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आता खरीप हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष रब्बी हंगामावर केंद्रित झाले असून, गहू आणि हरभरा या प्रमुख पिकांसाठी पाटबंधारे विभागाने पाटाला (कालव्याला) तातडीने पाणी सोडावे, अशी आर्त हाक शेतकरी वर्गातून दिली जात आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पावसाची अनियमितता राहिली. त्यानंतर पिकांवर पडलेले रोग, मशागत, महागडी बियाणे, खते आणि वाढीव मजुरीचा खर्चही अनेक शेतकऱ्यांच्या पदरात पडलेल्या उत्पादनातून वसूल होऊ शकलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक बजेट कोलमडले आहे. या बिकट परिस्थितीत रब्बी हंगामातील गहू, हरभरा व चारा पिकांवरच बळीराजाची भिस्त टिकून आहे. परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या संबंधित धरणांमध्ये यंदा १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणात मुबलक साठा असतानाही पाटाला पाणी सोडण्याबाबत प्रशासनाकडून अद्याप हालचाली न झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. पाटाला वेळेवर पाणी सुटल्यास पेरण्यांचे अचूक नियोजन करता येईल. याशिवाय पाटाच्या प्रवाहामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या भूजल पातळीत मोठी वाढ होऊन ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे.
Source link
शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाटाच्या पाण्याची प्रतीक्षा:खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी संकटात