Headlines

जिल्ह्यामध्ये सरी बरसल्या; संकटाचे ढग मात्र कायम:सप्टेंबरात 5.6 % पाऊस, सोयाबीन, कापूस धाेक्यात‎




जिल्ह्यात तब्बल ४२ दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी मान्सूनने अखेरच्या टप्प्यात हजेरी लावली. या पावसामुळे १ लाख २७ हजार हेक्टरवरील मका व चारा पिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी सोयाबीन, कापूस आणि डाळवर्गीय पिकांचे झालेले नुकसान कायम राहणार आहे. जिल्ह्यातील ५७ महसूल मंडळांत ३१ ते ४० दिवस, तर ५१ मंडळांत २१ ते ३० दिवस पावसाचा खंड राहिल्याने १०८ मंडळांतील पिके अक्षरशः होरपळली आहेत. १२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण हंगामात सरासरीच्या केवळ ५७.४ टक्के म्हणजे २५७.३ मिमी पाऊस झाला आहे. सप्टेंबरमध्ये तर सरासरीच्या अवघा ३.३ मिमी पाऊस झाला असून, त्याचे प्रमाण केवळ ५.६ टक्के आहे. पारनेरमध्ये १.६, शेवगाव १.७, श्रीरामपूर १.८, कर्जत १.९ आणि राहुरीत ३ टक्के पाऊस झाला आहे. सप्टेंबरच्या १२ दिवसांत जिल्ह्यातील १२ तालुक्यांत पावसाने एक आकडी टक्काही ओलांडलेला नाही. राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव आणि नेवासा पट्ट्यात खरीप पिकांची अवस्था चिंताजनक आहे. राहुरीत जून ते सप्टेंबरच्या सरासरी ४३१.८ मिमीच्या तुलनेत अवघा १११.८ मिमी म्हणजे २५.९ टक्के पाऊस झाला आहे. दुसरीकडे अकोलेत जूनपासून ५७२.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाचे मोठे विषम चित्र दिसत आहे. पिकांच्या निर्मितीचा अंतिम टप्पा जुलै-ऑगस्टमधील पावसानंतर सप्टेंबरमध्ये सोयाबीनमध्ये दाणे भरणे, तर कापसात बोंडे भरण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र ऑगस्ट कोरडा गेल्याने पिकांची वाढ खुंटली. आता अंतिम टप्प्यातच पिके करपू लागल्याने खरीप हंगामाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *