Headlines

जि.प. तयार करणार आरोग्य संपन्न गाव:सीईओंचे वर्षभराच्या आराखड्याचे निर्देश, कार्यशाळेस जिल्हाभरातून मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद‎




राज्य शासनाचे ‘माझं गाव-आरोग्य संपन्न गाव’अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी योग्य आखणी आणि सूक्ष्म नियोजन करून ग्रामस्तरीय समित्या सक्रिय करा. पुढे याच समित्या अधिक सक्षम करण्यासाठी तालुका स्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करुन वर्षभराचा आराखडा तयार करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी येथे केले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत स्थानिक ग्रामसेवक प्रशिक्षण केंद येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अध्यक्षस्थ म्हणून ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्रीराम कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण परिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बनसोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र सिरसाट, डॉ. क्षीरसागर, डॉ. स्वप्नील मालखेडे, डॉ. शरद जोगी, डॉ. पूनम मोहोकार तसेच समता फाउंडेशनचे रजनीकांत बिरजवार उपस्थित होते. सीईओ गांधी पुढे म्हणाले की, या अभियानाचा नियमित आढावा विभाग प्रमुखांच्या बैठकीत घेतला जाणार असल्याने तालुकानिहाय नियोजन करून जिल्हास्तरावर एकत्रित आराखडा तयार करावा व त्यानुसार काम सुरू करावे. तसेच यंत्रणेने नियमित कामकाज अधिक सुदृढ करत या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात सनियंत्रण समिती अंतर्गत ‘गाव कृती समिती’ या विषयावर डॉ. सालफळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच परिशिष्ट अ, ब व क यावर अनुक्रमे डॉ. निकोसे व डॉ. अंकुश मानकर यांनी माहिती दिली. अंतिम अंमलबजावणी या घटकांतर्गत प्रवेशिका सादरीकरण या विषयावर डॉ. सोनाली देशमुख, पुरस्कार स्वरूपाबाबत डॉ. शिल्पा बोरकर आणि कृती आराखड्याविषयी डॉ. तिलोत्तमा वानखडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण परिसे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मानकर यांनी केले, तर आभार डॉ. स्वप्नील मालखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *