![]()
ऑटोमोबाइल आणि ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेइकल) निर्मितीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात आता आणखी एका मोठ्या उद्योगाने पाऊल टाकण्याची तयारी सुरू केली आहे. भारतातील अग्रगण्य पोलाद उत्पादक कंपनी असलेल्या ‘जेएसडब्ल्यू स्टील’ने शहरात आपला नवीन प्लँट उभारण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. एमआयडीसीच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी व्यवस्थापनाने जयपूर एमआयडीसी परिसरामध्ये तब्बल २५ एकर जागेची चाचपणी सुरू केली आहे. शहरातील शेंद्रा आणि बिडकीन येथील ऑरिक सिटीमध्ये उद्योगांसाठीचे मोठे प्लॉट जवळपास संपले आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. परिणामी, नवीन उद्योगांकडून शहर परिसरातील इतर एमआयडीसींमध्ये जागेचा शोध सुरू आहे. अशातच आता ‘जेएसडब्ल्यू स्टील’सारख्या बलाढ्य समूहाने जयपूर एमआयडीसीतील उपलब्ध जागेची पाहणी करून उद्योग उभारणीसंदर्भात चाचपणी सुरू केल्याने स्थानिक औद्योगिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. या संदर्भात कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि एमआयडीसी प्रशासनात प्राथमिक स्तरावर चर्चा झाली असून, लवकरच जागेच्या वाटपाबाबत अधिकृत प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. जेएसडब्ल्यू स्टीलचा हा प्लँट सुरू झाल्यास मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, स्थानिक पुरवठादार आणि ‘एमएसएमई’ क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेएसडब्ल्यू कंपनीतर्फे विविध प्रकारचे कलर कोटेड शीट्स, गॅल्व्हल्यूम स्टील, कोल्ड रोल कॉइल्स, हॉट रोल कॉइल्स, वायर रोल आदींचे उत्पादन करण्यात येते. ऑटो, ईव्हीसाठी ठरणार बूस्टर छत्रपती संभाजीनगरात सध्या बजाज, स्कोडा-फॉक्सवॅगन, एथर एनर्जी यांसारख्या मोठ्या ऑटोमोबाइल व ईव्ही कंपन्या कार्यरत आहेत. जेएसडब्ल्यू स्टीलचा प्लँट येथे सुरू झाल्यास वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या उच्च दर्जाच्या स्टीलचा स्थानिक पातळीवरच पुरवठा होईल. यामुळे कंपन्यांचा वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि कच्च्या मालाची उपलब्धताही अधिक गतिमान होईल. हा बदल स्थानिक ऑटो उद्योगांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
Source link
जेएसडब्ल्यूकडून ‘जयपुरा’त 25 एकर जागेची चाचपणी:ईव्ही आणि ऑटोमोबाइल क्षेत्राला मिळणार मोठी गती