![]()
बार्शी लोकअदालतीदरम्यान चालता येत नसलेल्या एका वयोवृद्ध पक्षकाराची न्यायालयाबाहेर जाऊन संबंधित न्यायाधीशांनी व्हेरिफिकेशन घेतले आणि त्यांचे प्रकरण तडजोडीने निकाली काढले. तसेच वयोवृद्ध पक्षकार लक्ष्मी तुकाराम अवचार यांची विचारपूस करून त्यांचेही प्रकरण तडजोडीने निकाली काढण्यात आले. ज्येष्ठ महिलेसाठी संवेदनशील भूमिका महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार बार्शी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय महालोकअदालतीत विविध स्वरूपाची ९१० प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांत एकूण २ कोटी ६२ लाख ९६,६९१ रुपयांची वसुली झाल्याची माहिती बार्शी तालुका विधी सेवा समितीच्या वतीने देण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका विधी सेवा समिती आणि बार्शी वकील संघ यांच्या विद्यमाने ही लोकअदालत आयोजित केली होती. तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश वर्ग १ सूरज केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली लोकअदालतीचे कामकाज झाले. या राष्ट्रीय महालोकअदालतीसाठी एकूण ७७६४ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यापैकी प्रलंबित प्रकरणांमध्ये २ कोटी ७२ हजार ४१ रुपये, तर दाखलपूर्व प्रकरणांमध्ये ६२ लाख २४ हजार ६५० रुपये, अशी रक्कम वसूल झाल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयातील मोटार अपघाताच्या दोन प्रकरणांत तडजोड होऊन सुमारे ३३ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. तसेच एनआय अॅक्ट कलम १३८ अंतर्गत १४ प्रकरणांत तडजोड होऊन सुमारे ४१ लाख २२ हजार ४६२ रुपयांची वसुली झाली. रक्कम वसुलीच्या एका प्रकरणात तडजोड होऊन २ लाख ६२,२७६ रुपये वसूल झाले. कामकाज यशस्वी करण्यासाठी बार्शी वकील संघाचे अध्यक्ष रणजित गुंड, पॅनल विधिज्ञ, कर्मचारी, पोलिस कर्मचारी, बँका, पं. स., वीज वितरण कंपनीच्या प्रतिनिधींनी सहकार्य केले.
Source link
ज्येष्ठ महिलेसाठी न्यायाधीश आले चेंबर सोडून:बार्शी महालोकअदालत: 2 कोटी 62 लाख 96,691 रुपयांची वसुली; पक्षकारांचा मोठा सहभाग