![]()
शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि नव्याने तयार केलेल्या रस्त्यांना पडलेल्या भेगांच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे. रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करून खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि. १६) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. माजी मंत्री आ. बच्चू कडू, उपनेते गोपीकिशन बाजोरिया, संपर्कप्रमुख राजन साळवी, जिल्हा विशेष प्रभारी ललित वानखडे आणि चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महानगरप्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बाळापूर टी-पॉइंट ते रेल्वे गेट तसेच अन्नपूर्णा माता मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत असून गंभीर अपघातांची भीती निर्माण झाली आहे. याशिवाय रिधोरा ते शिवर दरम्यान नुकत्याच झालेल्या काँक्रीट रस्त्याला जागोजागी मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे. या काँक्रीट रस्त्याची तातडीने पाहणी करावी. कामाची चौकशी करावी. दुरुस्ती करावी. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर कार्यकारी अभियंत्यांनी एका आठवड्याच्या आत रस्त्यांवरील खड्डे बुजवून आवश्यक ती दुरुस्ती करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. या आंदोलनात मंगेश काळे, तरुण बगेरे, डॉ. ओळंबे, संतोष अनासने, विक्की बावरी, फिरोज पठाण, पवनेश अग्रवाल, गजानन बोराडे, प्रकाश वानखडे, योगेश ढोरे, किरण ठाकूर, प्रणव तायडे, आशिष सोनवणे, कुणाल शिंदे, अंकुश शिंत्रे, गोटू अग्रवाल, अभिषेक मिश्रा आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
रस्त्यांच्या दुरवस्थेवरून शिवसेना पक्षाने घेतली आक्रमक भूमिका:आठवडाभरात खड्डे बुजवण्याचे बांधकाम विभागाचे अश्वासन