![]()
श्री चक्रधर स्वामींचे जीवनचरित्र ‘लीळाचरित्र’ हा मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा आहे. या ग्रंथात धार्मिक विचार नसून, मानवी जीवनाला नैतिकतेची दिशा देणारा व्यापक वैचारिक आशय आहे, असे प्रतिपादन डॉ. अण्णा वैद्य यांनी केले. विद्यापीठात ‘सर्वसामान्यांचे कैवार
.
अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे होते. या वेळी डॉ. व्ही.एम. मेटकर, सुभाष पावडे, ॲड. अमोल ठाकरे, डॉ. राजेंद्र सोनपेठकर, डॉ. संदीप जुनघरे यांची उपस्थिती होती. या वेळी डॉ. वैद्य यांनी ‘लीळाचरित्र’च्या साहित्यिक, सामाजिक महत्त्वावर प्रकाश टाकताना सांगितले की, हा ग्रंथ कल्पित कथा नसून, श्री चक्रधर स्वामींच्या जीवनातील घटनांवर आधारित आहे. महानुभाव पंथाचा विचार हा प्रेम, जिव्हाळा, नैतिकतेवर आधारित असून त्यात बळजबरी किंवा दांभिकतेला स्थान नाही. श्री चक्रधर स्वामींनी सर्वसामान्यांच्या जीवनातील दुःख, व्यथा, वेदना समजून घेत त्यांच्या निवारणासाठी प्रयत्न केले. पैठण येथून त्यांनी मांडलेला ऐकेश्वरवादी, अद्वैती ‘ज्ञानमोचक’ विचार समाजात नैतिक व सात्त्विक ज्ञानाचा प्रसार करणारा ठरला, असेही डॉ. वैद्य यांनी स्पष्ट केले. मठ, मंदिरे, संमेलनांतून महानुभाव पंथाचा विचार समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुरू आहे. भारतीय ज्ञानप्रणालीमध्येही या विचाराचे महत्त्वाचे स्थान असून, मानवी कल्याणाचा विचार या तत्त्वज्ञानात असल्याने प्रत्येकाने त्याचा अभ्यास करून जीवनात अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी डॉ. वैद्य यांनी ‘सर्वसामान्यांचे कैवारी श्री चक्रधर स्वामी’ याचे सुलभ विवेचन केल्याचे सांगितले. श्री चक्रधर स्वामींनी सर्वसामान्यांच्या वेदना निवारण्यासाठी केलेल्या कार्याचे चित्रण व्याख्यानातून मांडले. सृष्टीच्या निर्मितीपासून अंतापर्यंतचे तत्त्वज्ञान त्यांच्या कार्यात कसे सामावलेले आहे, हे सोप्या भाषेत मांडले. अशा महान विचारांची देवाणघेवाण होणे गरजेचे असून, या कार्यात सर्वांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली आहे. प्रास्ताविक प्रा.सीमा मेटकर यांनी केले. संचालन डॉ. संदीप जुनघरे यांनी केले, तर आभार महंत डॉ. राजेंद्र सोनपेठकर यांनी मानले.