![]()
शहरासह तालुक्यात गेल्या ५० दिवसांत केवळ एका दिवसाचा अपवाद वगळता पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे. जुलै महिन्यातील पावसावर पेरणी केलेल्या पिकांना ऑगस्ट महिन्यापासून तीव्र उन्हाचा तडाखा बसत असल्याने ती सुकू लागली आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. या मागणीसाठी मूर्तिजापूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयासमोर बुधवारी (दि.१६) एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात राजू जोगदंड, चंदू लांडगे, सचिन तराळ, शंकरराव साबळे, जगतराव बुटे, प्रशांत कडू, तुळशीराम चुडे, वामनराव खंडारे, नागसेन गवई, मधुकरराव पुनसे, दिलीप टेकाळे, हरिदास सोळंके, गणेश अभ्यंकर, भारत इंगळे, राजेश प्रभे, ओंकार शिरसाठ, सुनील बोळे, प्रदीप डांगे, अमीन जायले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरसकट कर्जमाफी व विमा: शेतकऱ्यांना त्वरित संपूर्ण सरसकट कर्जमाफी द्यावी, पीकविम्याची थकीत रक्कम अदा करावी तसेच सोने तारण व सावकारी कर्जही माफ करावे. हेक्टरी ५० हजार अनुदान: खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे. अन्नधान्य व रोजगार: तालुक्यातील प्रत्येक शेतकरी व शेतमजुराला किमान ३० किलो अन्नधान्य मोफत वाटप करावे आणि ग्रामीण भागात तातडीने रोजगार उपलब्ध करून द्यावा. इतर उपाययोजना: शेतीसाठी अखंड वीजपुरवठा सुरू ठेवावा, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच शेतकरी व शेतमजुरांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती लागू कराव्यात.
Source link
कोरडा दुष्काळ जाहीर करत सरसकट कर्जमाफीसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन:शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार अनुदान व मोफत अन्नधान्य देण्याची मागणी