Headlines

झाडांची आराधना करून त्यांचे संगोपन करणारा सुसंस्कृत समाज घडावा- शिंदे:पर्यावरण, साहित्य आणि संवेदनशीलतेचा अनोखा संगम




माणूस निर्जीव मूर्तीची श्रद्धेने पूजा करतो; मात्र प्राणवायू, सावली, फळे आणि औषधे देणाऱ्या सजीव झाडांकडे दुर्लक्ष करतो. झाडांमध्येही जीव आणि संवेदना आहेत. त्यामुळे केवळ वृक्षारोपण करणारा नव्हे, तर झाडांची आराधना करून त्यांचे संगोपन करणारा सुसंस्कृत समाज घडला पाहिजे, असे प्रतिपादन अभिनेते तथा सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी केले. माऊली सेवा प्रतिष्ठानच्या देहरे येथील मनगाव प्रकल्पात आयोजित दोन दिवसीय ‘अक्षर मानव झाड संमेलन’ उत्साहात पार पडले. ‘एक संवाद… झाडांशी’ या संकल्पनेवर आधारित संमेलनात निसर्ग, साहित्य आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. अक्षर मानव महाराष्ट्र, सह्याद्री देवराई, फेन्सकोट इंजिनिअर्स, माऊली सेवा प्रतिष्ठान आणि वसुंधरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र धामणे, सहसंस्थापिका डॉ. सुचेता धामणे, वसुंधरा फाउंडेशनचे धनंजय भोसले, फेन्सकोट इंजिनिअर्सचे संजय सपकाळ, अक्षर मानव महाराष्ट्रचे अरुण मापारी यांच्यासह पर्यावरणप्रेमी, साहित्यिक, कवी, कलाकार, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय सपकाळ यांनी सयाजी शिंदे यांची प्रकट मुलाखत घेतली. तसेच मनगाव प्रकल्पात नव्याने उभारलेल्या ‘औदुंबर रंगशाळा’ या अँफीथिएटरचे उद्घाटन सयाजी शिंदे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविकात डॉ. राजेंद्र धामणे म्हणाले, “मानवसेवेसोबतच आता पर्यावरणसेवेचा नवा अध्याय सुरू करत आहोत. झाडांना माती, पाणी आणि संरक्षण देणे हीच खरी सार्वजनिक आरोग्याची सेवा आहे. डॉ. सुचेता धामणे यांनी बालपणापासून निसर्गाबद्दल कृतज्ञता निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. धनंजय भोसले, संजय सपकाळ आणि अरुण मापारी यांनी सामूहिक सहभागातूनच हरित चळवळ यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. कवी, साहित्यिक आणि पर्यावरणप्रेमींनी कविता, गाणी आणि मुक्त संवादातून झाडांशी असलेल्या माणसाच्या नात्यावर प्रकाश टाकला. प्रा. वसंत झावरे, शशिकांत साळवे, राजेंद्र साळवे उपस्थित होते. सेल्फीपुरते वृक्षारोपण नको आपण देवाला फुले अर्पण करतो; पण ती फुले देणाऱ्या झाडांचे ऋण मानत नाही. झाड कधीही जात, धर्म किंवा श्रीमंतीची चौकशी करत नाही. समता, ममता आणि परोपकार ही मूल्ये माणसाने झाडांकडून शिकली पाहिजेत. केवळ छायाचित्रे किंवा सेल्फीसाठी रोपे लावणे म्हणजे पर्यावरण संरक्षण नव्हे. प्रत्येकाने किमान एका झाडाची जबाबदारी स्वीकारून कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याचे संगोपन करावे,” असे आवाहन त्यांनी केले. मनगाव प्रकल्पाच्या कार्याचे कौतुक करताना “निराधार माणसांना आधार आणि उजाड भूमीला हिरवाई देणाऱ्या या दोन्ही कार्यांच्या मुळाशी करुणाच आहे, असे सयाजी शिंदे म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *