Headlines

टाकरखेडा संभूमध्ये तीव्र पाणीटंचाई:नवीन जलकुंभ बंद, नागरिक संतप्त; समस्या न सुटल्यास ग्रामस्थांकडून उपोषणाचा इशारा




टाकरखेडा संभू येथे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या १०५ गावे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत समावेश असूनही, नियोजनाअभावी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून, समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सुमारे सात हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सध्या दीड लाख लीटर क्षमतेचा एक जलकुंभ कार्यरत आहे. मात्र, जल जीवन मिशन अंतर्गत दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला ५० हजार लीटर क्षमतेचा नवीन जलकुंभ अद्याप पाईपलाईनला जोडलेला नाही. त्यामुळे हा नवीन जलकुंभ असूनही त्याचा नागरिकांना कोणताही उपयोग होत नाही. नवा जलकुंभ कार्यान्वित नसल्याने गावातील अनेक भागांमध्ये चार ते पाच दिवसांनी पाणी सोडले जाते. यामुळे बहुसंख्य ग्रामस्थांना विहीर, हापशी किंवा इतरांच्या घरून पाणी आणावे लागते. विशेषतः भीमवाडी आणि झोपडपट्टी भागातील परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. टाकरखेडा शंभू येथील रहिवासी शैलेश चांदुरकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. गेल्या एक महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे त्यांनी नमूद केले. नियमित पाणी बिल भरूनही पुरवठा होत नसल्याने प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. भीमवाडी निवासी अरुण मेश्राम यांनी सांगितले की, त्यांच्या भागात पाणीच येत नाही आणि ग्रामपंचायतीला फोन केल्यानंतरच कधीतरी पाणी मिळते. १०० ते १५० घरांची वस्ती पाण्याविना त्रस्त आहे. ज्येष्ठ नागरिक मधुकरराव भालचक्र यांच्या मते, झोपडपट्टी भागात पाणी येत नाही, पाण्यासाठी बसस्टँड, विहीर आणि हापशीवरच जावे लागते. या भागाचे प्रतिनिधी रामराव गुल्हाने यांनीही पाच दिवसांनी कमी वेळेसाठी पाणी येत असल्याने गैरसोय होत असल्याचे सांगितले. उपसरपंच प्रदीप शेंडे यांनी यासंदर्भात प्रशासनाला वारंवार निवेदने दिली आहेत. आमदार, खासदार आणि आढावा बैठकीतही त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला, परंतु अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे पाणी समस्या तातडीने सोडवली नाही, तर ग्रामस्थांच्यावतीने उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *