Headlines

टाळ-मृदंगाचा गजर, मुखी माऊलींचा जयघोष; जायखेड्यात संतभेट सोहळा:हरिपाठ, महाप्रसाद आणि कृष्णा महाराज रासवे यांच्या कीर्तनाने रंगत



चालू वर्षातील गंभीर दुष्काळाचे सावट आणि आव्हाने असतानाही वारकरी संप्रदायाचे परमश्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जायखेडा येथे वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णाजी माऊली यांच्या समाधीस्थळी दीपावली पाडव्याचा (बलिप्रतिपदा) ‘संतभेट सोहळा’ भक्तिमय वातावरणात झाला.

.

यंदा संपूर्ण परिसरावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरी आणि नागरिक चिंतातुर आहेत; मात्र संकट कितीही मोठे असले तरी गुरुमाऊलींवर असलेली अढळ श्रद्धा तसूभरही डगमगलेली नाही, हेच या संतभेट सोहळ्यातून दिसून आले. सर्वसामान्य नागरिक घरोघरी दीपोत्सव साजरा करतात; मात्र माऊलींचे निष्ठावंत भक्तगण दुष्काळाचे दुःख विसरून दरवर्षीप्रमाणे पाडव्याच्या मंगल प्रभाती जायखेड्यात दाखल झाले. माऊलींच्या समाधीचे दर्शन आणि संतभेटीच्या माध्यमातून त्यांनी आपली भक्तिदिवाळी साजरी केली. भक्ती, श्रद्धा आणि सुसंस्कारांचा हा विलोभनीय संगम भाविकांच्या उपस्थितीत अनुभवायला मिळाला. गुरुरायांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आलेल्या भाविकांच्या अलोट जनसागरामुळे जायखेड्याला पंढरीचे रूप प्राप्त झाले होते. हा सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

कीर्तनाने आत्मिक आनंद सोहळ्याचा मुख्य आकर्षणबिंदू म्हणजे रात्री ८ ते १० या वेळेत रंगलेला कीर्तन सोहळा. ज्ञानेश्वरी कंठस्थ ह.भ.प. कृष्णा महाराज रासवे (आळंदी) यांच्या प्रबोधनात्मक आणि रसाळ वाणीतून सादर झालेल्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमूग्ध झाले. दुष्काळाच्या कठीण प्रसंगातही खचून न जाता मनोधैर्य कसे टिकवावे आणि संतांच्या विचारांची कास धरून आयुष्याची वाटचाल कशी करावी, असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या कीर्तनातून दिला. पाडव्याच्या या पावनप्रसंगी जायखेड्यात अवतरलेल्या भक्तीच्या महाकुंभाने प्रत्येक भाविकाच्या मनात नवी आशा व आत्मिक समाधानाची ज्योत प्रज्वलित केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *