![]()
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदारयादीच्या पुनर्रनिरीक्षण प्रक्रियेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदारयादीतील कथित अनियमितता आणि SIR प्रक्रियेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. उद्या, 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राची करमणूक करत असून, आपल्या राजकीय अपयशाचे खापर निवडणूक आयोगावर फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप कदम यांनी केला. ‘अपयश लपवण्यासाठी निवडणूक आयोगाला बदनाम करत आहेत’ उद्धव ठाकरे यांनी आधी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले. निवडणूक आयोगावर आरोप करण्यापूर्वी निवडणुकीतील जनतेचा कौल लक्षात घ्यायला हवा, असे ते म्हणाले. काँग्रेसचे अधिक खासदार निवडून आले त्यावेळी निवडणूक आयोगाने गडबड केली नव्हती का? असा सवाल करत कदम यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एखाद्या निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने लागला नाही की निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे स्वतःचे राजकीय अपयश लपवण्यासाठी निवडणूक आयोगाला बदनाम करत असल्याचा आरोपही कदम यांनी केला. अशा प्रकारच्या राजकीय प्रवृत्तीचा आपण निषेध करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘बूंद से जाती है, वो हौद से नहीं आती’ उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी जनतेच्या न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने नेमका काय कौल दिला, याचे आत्मपरीक्षण ठाकरे यांनी करावे, असा टोला रामदास कदम यांनी लगावला. यावेळी त्यांनी हिंदीतील एका म्हणीचा आधार घेत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. ‘बूंद से जाती है, वो हौद से नहीं आती,’ असे म्हणत जवळची माणसे आणि पक्षातील अनेक नेते का दूर गेले, याचा विचार करण्याचा सल्ला त्यांनी दिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन आंदोलन करत असले तरी त्यामागे जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकीय हेतू अधिक असल्याचा दावा कदम यांनी केला. दोन्ही ठाकरे बंधू महाराष्ट्राची करमणूक करत असून, नौटंकीच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. ‘एक दिवस दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल,’ असे म्हणत या संपूर्ण राजकीय घडामोडींचा खरा चेहरा भविष्यात स्पष्ट होईल, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला. विद्यार्थ्यांना राजकीय आंदोलनात सहभागी करण्यावरही आक्षेप दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सहभागाशी संबंधित मुद्द्यावरही रामदास कदम यांनी भाष्य केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक आणि विद्यार्थीवर्गाशी संबंधित प्रश्नांसाठी आंदोलन करावे. त्या प्रश्नांसाठी आपण त्यांच्या सोबत उभे राहू, असे कदम यांनी स्पष्ट केले. मात्र विद्यार्थ्यांना थेट राजकीय विषयांमध्ये ओढणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्राला बदनाम करण्याची राजकीय खेळी केली जात असल्याचा आरोप कदम यांनी केला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपले प्रश्न केंद्रस्थानी ठेवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोणाकडून होत आहे, याचा विचार करण्याची गरज असल्याचे कदम यांनी म्हटले. मिठी नदीच्या कामावरून ठाकरे पिता-पुत्रांवर आरोप याचवेळी रामदास कदम यांनी पर्यावरण मंत्री असताना मुंबईतील मिठी नदीसाठी केलेल्या कामांचाही संदर्भ दिला. आपल्या कार्यकाळात मिठी नदीच्या दोन्ही बाजूंना रस्ते करण्यासह नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे हटविण्याची प्रक्रिया सुरू केली होती, असा दावा त्यांनी केला. मिठी नदीची खोली वाढवणे आणि रुंदीकरण करणे, तसेच नदीच्या दोन्ही बाजूंनी सांडपाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, असे कदम यांनी सांगितले. सांडपाणी एकत्र करून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते खाडीत सोडण्याची योजना होती, असा दावाही त्यांनी केला. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पर्यावरण विभागाची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आणि त्यानंतर आपण सुचवलेले निर्णय थांबवण्यात आले, असा आरोप रामदास कदम यांनी केला. आपल्या प्रस्तावानुसार काम झाले असते तर मिठी नदीचा सुमारे 20 किलोमीटरचा परिसर स्वच्छ झाला असता. त्यासोबतच या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची संधी निर्माण झाली असती, असा दावा त्यांनी केला. मिठी नदीशी संबंधित अनेक प्रश्नही या माध्यमातून मार्गी लागू शकले असते, असे कदम यांनी सांगितले. ठाकरे बंधूंच्या मोर्चाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष दरम्यान, 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोग, मतदारयादी आणि SIR प्रक्रियेच्या मुद्द्यावरून होणाऱ्या या आंदोलनात कोणते राजकीय पक्ष सहभागी होतात, यावरही पुढील राजकीय समीकरणांची चर्चा होण्याची शक्यता आहे. एका बाजूला ठाकरे बंधू निवडणूक प्रक्रियेतील कथित त्रुटींविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना दुसऱ्या बाजूला सत्ताधारी गटाकडून या आंदोलनाच्या राजकीय हेतूंवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे 4 ऑक्टोबरचा मोर्चा केवळ निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलन न राहता महाराष्ट्राच्या राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण देण्याची शक्यता आहे. हेही वाचा… मातंग समाजाच्या उपवर्गीकरणावरून सदावर्तेंचा आक्रमक पवित्रा:‘एकनाथ शिंदेंसारखे पाच जण आले तरी निर्णय होऊ देणार नाही’ अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. अनुसूचित जातींमधील विविध समाजघटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी काही संघटनांकडून केली जात आहे. मात्र, या उपवर्गीकरणाला विरोधही होत असून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी नाशिकमध्ये आक्रमक भूमिका मांडली आहे. सविस्तर वाचा…
Source link
ठाकरे बंधू महाराष्ट्राची करमणूक करतायेत:रामदास कदमांचा घणाघात, म्हणाले- एक दिवस दूध का दूध, पाणी का पाणी होईल