Headlines

डी. बी. स्टार एक्स्पाेज:छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या नूतनीकरणात दीरंगाई, खेळाडूंची गैरसोय, दोन वर्षे उलटूनही काम कासवगतीने; 25 कोटी रुपये खर्च




देशासह राज्यात नाशिकच्या खेळाडूंचा डंका वाजणारे मैदान असा नावलौकिक असलेल्या सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान नूतनीकरणाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. त्याचा सर्वाधिक फटका या ठिकाणी जिल्हा व राज्य पातळीवर खेळण्यासाठी सराव करणाऱ्या खेळाडूंना बसला आहे. मागील दोन वर्षापासून 25 कोटी रुपये खर्च करून मैदान नूतनीकरणाचा नुसताच गाजावाजा सुरू असून, प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यास एक ते दीड वर्ष कालावधी लागू शकतो. कामाच्या दिरंगाईबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी व शासनाच्या बांधकाम विभागात टोलवाटोलवी सुरू असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समोर आले. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर अनेक खेळाडू घडले व त्यांनी नाशिकचे नाव राज्यासह देशात पोहचवले. या ठिकाणी खो खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, ज्युडो, तलवारबाजी, फुटबॉल, क्रिकेट अशा खेळांचे प्रशिक्षण दिले जात होते. दिवसभर मैदान खेळाडूंनी गजबजलेले राहायचे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय देखील येथे होते. मात्र, तीन वर्षांपासून या मैदानाचे नूतनीकरण सुरू आहे. कामाच्या नावाखाली हे मैदान खोदले आहे. ठिकठिकाणी मातीचे ढिगारे, बांधकाम साहित्य, भंगार वस्तू यांचा ढीग पडलेला आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मैदान कामाचे भूमिपूजन झाले. दीड वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण होऊन या ठिकाणी सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंना जागतिक दर्जाचे मैदान व सुविधा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे खेळाडूंची मोठी गैरसोय होत आहे. सरावासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एवढे मोठे मैदान उपलब्ध नसल्याने खेळाडूंना पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुल येथे जाऊन सराव करावा लागत आहे. या ठिकाणी असलेले क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे हलविल्याने खेळाडू तसेच क्रीडा क्षेत्रातील सर्वांना गैरसोयीचे झाले आहे. संथ कामामुळे खेळाडूंची गैरसोय छत्रपती शिवाजी महाराज मैदान नाशिकच्या खेळाडूंसाठी हक्काचे ठिकाण आहे. नूतनीकरणाचे काम अतिशय संथ असल्याने त्याचा फटका खेळाडूंना बसत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी या दिरंगाईबाबत जनतेस माहिती द्यावी. – अविनाश खैरनार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा संघटक या कामांचा समावेश शासनाने मैदान नूतनीकरणासाठी 25 कोटी रुपये निधी दिला आहे. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मैदान विकसित केले जात आहे. त्यात रनिंग ट्रॅक, इंडोर हॉल, प्रेक्षक गॅलरी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय केले जात आहे. थेट प्रश्न सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक सहा महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित Q : मैदानाच्या कामास दिरंगाई का होत आहे? A-मैदानाचे बांधकाम शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. मैदान हस्तांतरण व इतर कारणांमुळे नूतनीकरण कामास विलंब झाला आहे. ही कारणे दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. Q : मैदानाचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल? खेळाडूंची प्रचंड गैरसोय होत आहे A- पुढील सहा महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. बांधकाम विभागच याबाबत अधिक सांगू शकेल. पावसाळ्यात साचणार तळे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून लवकरच काम पूर्ण होईल, असा दावा केला जात असला तरी पावसाळ्यात या मैदानावर तळे साचलेले असते. मग या मैदानाचे काम वेळेत पूर्ण होणार कसे काय? असा प्रश्न शहरातील क्रीडाप्रेमी, खेळाडू, प्रशिक्षक यांनी उपस्थित केला आहे. नूतनीकरण कामाचा वेग मंदावला मैदान नूतनीकरण कामाचा वेग अतिशय मंद आहे. लवकरात लवकर मैदानाचे काम पूर्ण करून त्या ठिकाणी खेळाडूंना सराव करता आला पाहिजे. परंतु, कामाचा वेग बघता काम कधी पूर्ण होईल हे अधिकारी देखील सांगू शकणार नाही. – मंदार देशमुख, प्रशिक्षक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *