Headlines

तटकरे पोहोचण्याआधीच प्रफुल्ल पटेल सिल्व्हर ओकवर उपस्थित होते:राष्ट्रवादीच्या राजकारणात सस्पेन्स; मोठ्या राजकीय हालचालींची चाहूल




राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरू असलेल्या अंतर्गत नाराजी आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन वरिष्ठ नेत्यांना संघटनेत दुय्यम स्थान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत प्रफुल्ल पटेल यांचे नाव मागे पडल्याची चर्चा झाली, तर सुनील तटकरे यांच्याबाबतही प्रदेशाध्यक्ष म्हणून फारसा उल्लेख टाळण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या पार्श्वभूमीवर घडलेल्या एका गुप्त भेटीमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी 12 मे रोजी अचानक मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी या भेटीमागील नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, तटकरे यांच्याआधीच प्रफुल्ल पटेल हे देखील सिल्व्हर ओकवर उपस्थित होते. विशेष म्हणजे, त्यांच्या या भेटीचा कोणालाही सुगावा लागला नव्हता. राष्ट्रवादीतील सध्याच्या घडामोडींवर प्रफुल्ल पटेल यांनी आतापर्यंत मौन बाळगले होते. त्यामुळे त्यांनीही शरद पवारांची भेट घेतल्याचे समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना अधिक वेग आला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, प्रफुल्ल पटेल यांनी आधीच शरद पवारांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. त्यानंतर ऐनवेळी सुनील तटकरे देखील सिल्व्हर ओकवर पोहोचले. या तिन्ही नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलीनीकरणाबाबत सातत्याने चर्चा सुरू आहेत. त्यातच या भेटीमुळे दोन्ही गटांमध्ये पडद्यामागे काही महत्त्वाच्या हालचाली सुरू असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे 12 मे रोजीच आसाममधील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी गुवाहाटी येथे गेले होते. त्या दौऱ्यात सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. मात्र, परतीच्या प्रवासात सुनेत्रा पवार यांनी स्वतःच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमानाने प्रवास केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. यामुळेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नाराजीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले. या घटनांनंतर लगेचच दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीत अंतर्गत राजकारण तापल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही गटांमध्ये पुन्हा जवळीक वाढणार का दरम्यान, या गुप्त बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय दिशा काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही गटांमध्ये पुन्हा जवळीक वाढणार का, की नेतृत्वाच्या प्रश्नावर आणखी संघर्ष निर्माण होणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची नवी मांडणी सुरू असताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या अनुभवी नेत्यांच्या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *