Headlines

तीव्र उन्हामध्ये कांदा काढणीला आला वेग




सध्या बाजारात कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसला, तरी “शेती थांबत नाही’ हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातील शेतांमध्ये सध्या कडक उन्हाची पर्वा न करता कांदा काढणीची मोठी लगबग सुरू आहे. परिसरातील आळे, संतवाडी, कोळवाडी, लवनवाडी, राजुरी, तांबेवाडी, बोरी बुद्रुक, पिंपळवंडी, काळवाडी, उंब्रज नंबर एक व दोन या गावांमध्ये मजुरांच्या साहाय्याने कांदा काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. यंदा उत्पादन चांगले झाले असले, तरी बाजारभावाने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली आहे. खर्चाच्या तुलनेत दर अत्यंत कमी असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. मात्र, कडक उन्हामुळे पीक शेतात जास्त काळ ठेवणे नुकसानकारक ठरू शकते, म्हणूनच उन्हापासून कांदा वाचवण्यासाठी शेतकरी काढणी उरकत आहेत. तापमानाचा पारा वाढल्याने दुपारच्या वेळी उष्णतेचा तडाखा तीव्र जाणवत आहे. त्यामुळे मजूर व शेतकरी डोक्यावर टॉवेल, टोपी बांधून, सोबत पाण्याच्या बाटल्या ठेवून आणि मधूनमधून सावलीत विश्रांती घेत काम करत आहेत. महिला वर्गही कांदा वेचणी व गोणी भरण्याच्या कामात व्यस्त आहे. “भाव नसला तरी पीक काढावेच लागते,” अशी खंत चंद्रकांत घोडके, राजेश कणसे, वसंत कदम व शिवाजी डुंबरे या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वाढती मजुरी आणि वाहतूक खर्चामुळे शेतकरी चिंतेत असूनही आशेवर घाम गाळत आहे. खर्च सुटेना; वाहतूक-मजुरीचा बोजा कांदा काढणीनंतर तो शेतात सुकवणे, प्रतवारी करणे आणि बाजारात पाठवण्याची तयारी सुरू आहे. मात्र, बाजारातील मंदीमुळे वाहतूक, तोलाई आणि मजुरीचा खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही उरत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *