![]()
“खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेली ऑडिओ क्लिप पूर्णपणे खोटी, बनावट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केलेली आहे. केज नगरपंचायतीच्या निवडणुकीत माझ्या पत्नीने त्यांच्या मुलीचा पराभव केला, तेव्हापासूनच सोनवणे यांच्या मनात माझ्याबद्दल प्रचंड राग आणि राजकीय आकस आहे. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मला बदनाम करणे आणि राजकीय पटलावरून कायमचे संपवणे हाच या बनावट क्लिपमागील एकमेव हेतू आहे,” असा जोरदार आणि खळबळजनक पलटवार सुग्रीव कराड यांनी केला आहे. बीड जिल्हा कारागृहातून विलास घुले खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. या पत्रकार परिषदेत सोनवणे यांनी कारागृहात बंदिस्त असलेला आरोपी वाल्मिक कराड आणि सुग्रीव कराड यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप जाहीर करून प्रशासनाला धारेवर धरले होते. या आरोपांनंतर कारागृह प्रशासनाने तब्बल सात तास सलग झाडाझडती घेत चौकशी सत्र सुरू केले असतानाच, आता या संभाषणात नाव आलेल्या सुग्रीव कराड यांची पहिली प्रतिक्रिया समोर आल्याने राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. नगरपंचायतीत मुलीचा पराभव पचवता आला नाही; मला 2-3 वेळा अडकवण्याचा प्रयत्न खासदार बजरंग सोनवणे यांच्या आरोपांवर सुग्रीव कराड म्हणाले, “खासदार बजरंग सोनवणे यांची कन्या आणि माझी पत्नी या केज नगरपंचायतीच्या एकाच वॉर्डातून निवडणुकीच्या रिंगणात समोरासमोर उभ्या होत्या. त्या निवडणुकीत माझ्या पत्नीने त्यांच्या मुलीचा दारुण पराभव केला. तेव्हापासून खासदारांच्या मनात माझ्याविषयी तीव्र चीड निर्माण झाली आहे. याच रागापोटी मला सातत्याने बदनाम करण्याचे कुटील डावपेच आखले जात आहेत.” राजकारणातून हटवण्यासाठी दबाव “यापूर्वीही मला दोन ते तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नाहक गोवण्याचा प्रयत्न झाला, याचे सर्व पुरावे माझ्याकडे सुरक्षित आहेत. मी स्वतः कधीही त्यांच्या विरोधात गेलो नाही. मात्र, मी राजकारणातून बाजूला व्हावे यासाठी माझ्यावर सातत्याने दबाव आणला गेला. मी दबावाला बळी न पडता मागे हटलो नाही, म्हणूनच आता पुन्हा नगरपंचायत निवडणुका तोंडावर असताना अशा बनावट क्लिप्स आणून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.” उमरी टोलनाका वादावर सुग्रीव कराडांचे स्पष्टीकरण काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या केज तालुक्यातील उमरी टोलनाक्यावरील शिवीगाळ व वादाच्या जुन्या व्हिडिओवरही कराड यांनी सविस्तर खुलासा केला. “टोलनाका चालक देशमुख हे माझे जुने मित्र आहेत. त्या दिवशी माझ्या वाहनाच्या फास्टॅगमधील (FASTag) पैसे संपले होते. मी कर्मचाऱ्यांना विनंती करत होतो, परंतु त्यांनी ऐकून न घेता अरेरावी केली. त्यातून कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाली होती.” कोर्टात वाद सामोपचाराने मिटला “या वादानंतर संबंधितांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानंतर आम्ही स्वतः पोलीस ठाण्यात आणि नंतर न्यायालयात जाऊन हा वाद सामोपचाराने पूर्णपणे मिटवलेला आहे. जुनी प्रकरणे उकरून काढून केवळ माझे चारित्र्यहनन करण्याचा उद्योग विरोधक करत आहेत.” बीड कारागृहाची सात तास झाडाझडती; सुरक्षेचे धिंडवडे पुन्हा चव्हाट्यावर खासदार सोनवणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण पोलीस आणि कारागृह प्रशासन हादरून गेले आहे. जेलमधून फोन कॉल गेल्याचा आरोप होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा कारागृहाची तब्बल ७ तास कसून झाडाझडती घेण्यात आली. बॅरॅक, कैद्यांचे सामान आणि संशयित ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून काही कैद्यांची चौकशीही नोंदवण्यात आली आहे. कारागृहातील ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’चा इतिहास बीड जिल्हा कारागृह गेल्या वर्षभरापासून सातत्याने वादग्रस्त ठरत आहे. बहुचर्चित सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराडसह अनेक गंभीर गुन्ह्यांतील गुन्हेगार येथे बंदिस्त आहेत. यापूर्वीही संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कारागृहात विशिष्ट कैद्यांना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जात असल्याचा थेट आरोप केला होता. आता खुद्द खासदारांच्या मुलाला जेलमधून अडकवण्याचा कट रचला गेल्याच्या दाव्याने कारागृहातील मोबाइल आणि सुरक्षिततेच्या चिंधड्या उडाल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे बीडमधील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला असून, ती ऑडिओ क्लिप खरी आहे की सुग्रीव कराड यांच्या दाव्यानुसार एआय (AI) जनरेटेड आहे, याचा सायबर फॉरेन्सिक तपास अहवाल समोर आल्यानंतरच या प्रकरणातील अंतिम सत्य स्पष्ट होणार आहे. —————————————————- हेही वाचा… काँग्रेसची डबल ढोलकी स्वतःच्याच मंत्र्यांच्या विधानाने उघडी!: संसदेतील अधिकृत रेकॉर्ड बदलत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी कपिल सिब्बल यांचा जुना व्हिडिओ केला शेअर मतदार याद्यांमधील कथित घोळ, मतदार पुनर्पडताळणीची ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीतील संसदेपासून रस्त्यांपर्यंत रान उठवले असतानाच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट संसदेतील ऐतिहासिक पुराव्यासह काँग्रेसचा बुरखा फाडला आहे. संपुआ (UPA) सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी संसदेत एसआयआर प्रक्रियेचे ठाम समर्थन करत दिलेले स्पष्टीकरण आणि अधिकृत रेकॉर्डवरील व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. “काँग्रेसच्या राजकारणाचे रंग सोयीनुसार बदलले, तरी संसदेतील अधिकृत रेकॉर्ड बदलत नाहीत,” असा घणाघाती टोला लगावत फडणवीस यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातील हवाच काढून घेतली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
ती 'एआय'ने बनवलेली खोटी ऑडिओ क्लिप:मुलीचा पराभव केल्यानेच बजरंग सोनवणेंचा मला संपवण्याचा कट; बीड कारागृह कॉल प्रकरणावर सुग्रीव कराडचा पलटवार