“एमपीएससीमधील (MPSC) दलालांचे आणि अधिकाऱ्यांचे अंतर्गत रॅकेट जोपर्यंत उद्ध्वस्त केले जात नाही, तोपर्यंत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या राज्यातील लाखो गरीब विद्यार्थ्यांचा या व्यवस्थेवर विश्वास बसणार नाही. एमपीएससीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य
.
पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. सलग नऊ दिवसांच्या उपोषणामुळे आंदोलक विद्यार्थ्यांची प्रकृती कमालीची खालावली असून, डॉक्टरांनी किडनी निकामी होण्याचा इशारा दिल्यानंतर रोहित पवार आणि ज्येष्ठ नेत्यांच्या आग्रहाखातर तिघांनी मध्यरात्री आपले आमरण उपोषण मागे घेतले. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर सडकून टीका केली.
मित्रासाठी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; गेंड्याच्या कातडीचे सरकार!
उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या खालावलेल्या आरोग्यावरून रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. “अन्नत्याग करून बसलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांची प्रकृती वेगाने बिघडत चालली आहे. ऋषिकेश गांगर्डे, सोमनाथ चव्हाण आणि गजानन शेळके या तीन विद्यार्थ्यांच्या किडन्यांवर गंभीर परिणाम झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. ऋषिकेश सातत्याने विद्यार्थ्यांची बाजू मांडत असल्याने त्याची प्रकृती जास्तच खालावली होती. या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला निष्पाप मुलांच्या जिवाचे काहीच सोयरसुतक उरलेले नाही.”
विश्वजित कदमांच्या उपस्थितीत तिघांचे उपोषण मागे
“एका मित्राला वाचवण्यासाठी सरकार आंदोलनकर्त्यांच्या जिवाशी खेळत आहे. आम्ही आणि ज्येष्ठ नेत्यांनी विनंती केल्यावर या तिघांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी रात्री उपोषण सोडले. काँग्रेस आमदार डॉ. विश्वजित कदम आणि विराज शिंदे या चिमुकल्याच्या हस्ते दूध पिऊन या तिघांनी उपोषणाची सांगता केली. उर्वरित चौघांची प्रकृतीही नाजूक असून, त्यांनीही स्वतःच्या शरीराची काळजी घेऊन उपोषण मागे घ्यावे, अशी मी त्यांना पुन्हा कळकळीची विनंती करत आहे.”
एमपीएससीच्या शुद्धीकरणाचा ड्राफ्ट मुख्यमंत्र्यांना पाठवला
आयोगातील भ्रष्टाचाराच्या मुळावर बोट ठेवत रोहित पवार म्हणाले, “एमपीएससीचे शुद्धीकरण कसे करायचे, या संपूर्ण गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी नेमल्या जाणाऱ्या उच्चस्तरीय समितीवर कोणते प्रामाणिक अधिकारी असावेत, याचा एक सर्वसमावेशक मसुदा (ड्राफ्ट) आम्ही स्वतः मुख्यमंत्री आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. काही निवृत्त न्यायाधीशांच्या नावांवर सरकारने आक्षेप घेतले असले, तरी चौकशी निष्पक्ष झालीच पाहिजे.”
केवळ पदभरतीची घोषणा म्हणजे दिशाभूल
“राज ठाकरे किंवा इतर नेत्यांनी उपस्थित केलेला भरतीचा प्रश्न सुटला असला, तरी मूळ रोगावर इलाज झालेला नाही. पेपरफुटीचे रॅकेट कायम ठेवून जर सरकारने 70 हजारांची नोकरभरती काढली, तर परीक्षा माफिया आणि दलालच गब्बर होतील आणि रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या गरीब शेतकरी-कष्टकऱ्यांच्या मुलांवर पुन्हा तोच अन्याय होईल. त्यामुळे आधी अध्यक्षांचा नैतिकतेवर राजीनामा घेऊन संपूर्ण यंत्रणा स्वच्छ केली पाहिजे.”
पोलिसांच्या नोटिशीनंतरही विद्यार्थी भूमिकेवर ठाम; पूल सोडण्यास नकार
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत पुणे पोलिसांनी एस. एम. जोशी पूल तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्याच्या नोटिसा आंदोलकांना बजावल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचा रोष अजूनही कायम आहे. न्यायालयीन आदेशाचा आम्ही आदर करतो, परंतु परीक्षांमधील पारदर्शकता, अध्यक्षांची हकालपट्टी आणि सर्वसमावेशक चौकशीचा ठोस लेखी निर्णय जोपर्यंत हातात पडत नाही, तोपर्यंत आंदोलनस्थळ सोडणार नाही, असा ठाम पवित्रा विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी घेतला आहे.
आंदोलनाला विविध घटकांचा वाढता पाठिंबा
आंदोलनाच्या नवव्या दिवशीही हजारो विद्यार्थी रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. तीन विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले असले, तरी अन्य चार विद्यार्थी उपोषणावर ठाम असून राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा वाढत असल्याने पुणे प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
———————————————————-
हेही वाचा…
काँग्रेसची डबल ढोलकी स्वतःच्याच मंत्र्यांच्या विधानाने उघडी!:संसदेतील अधिकृत रेकॉर्ड बदलत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी कपिल सिब्बल यांचा जुना व्हिडिओ केला शेअर

मतदार याद्यांमधील कथित घोळ, मतदार पुनर्पडताळणीची ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रिया आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीने दिल्लीतील संसदेपासून रस्त्यांपर्यंत रान उठवले असतानाच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट संसदेतील ऐतिहासिक पुराव्यासह काँग्रेसचा बुरखा फाडला आहे. संपुआ (UPA) सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी संसदेत एसआयआर प्रक्रियेचे ठाम समर्थन करत दिलेले स्पष्टीकरण आणि अधिकृत रेकॉर्डवरील व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. “काँग्रेसच्या राजकारणाचे रंग सोयीनुसार बदलले, तरी संसदेतील अधिकृत रेकॉर्ड बदलत नाहीत,” असा घणाघाती टोला लगावत फडणवीस यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनातील हवाच काढून घेतली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी