![]()
श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोडवर एका भरधाव वाळूच्या ट्रकने स्कुटीला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात स्कुटीवरील तरुणी थोडक्यात बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर रोडवरून विनापरवाना वाळू वाहतूक करणारा एक ट्रक वळत असताना, समोरून स्कुटीवरून येणाऱ्या तरुणीला त्याने जोराची धडक दिली. या धडकेमुळे स्कुटी ट्रकला धडकून खाली पडली आणि स्कुटीवरील तरुणी हवेत उडाली. ट्रक पूर्णपणे न थांबल्यामुळे तरुणी थेट ट्रकच्या समोरच जमिनीवर पडणार होती. मात्र, तिने प्रसंगावधान राखत अत्यंत चपळाईने ट्रकच्या बंपरला धरून स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर तिने स्वतः उठून आपली स्कुटी बाजूला उभी केली. अपघातानंतर मदतीचा हात देण्याऐवजी उलट ट्रकचालकाने तरुणीशीच हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आजूबाजूचे नागरिक तात्काळ मदतीसाठी धावून आल्याने चालकाने तेथून पोबारा केला. हा ट्रक वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील वाळू लिलावातील असून, त्याला नंबरप्लेटच नव्हती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात विनापरवाना आणि भरधाव वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुका पोलिसांनी अशा नंबरप्लेट नसलेल्या आणि नियम धाब्यावर बसवून वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी संतप्त नागरिकांमधून केली जात आहे. हे ही वृत्त वाचा मुंबईतील IIT पवई कॅम्पसमध्ये मध्यरात्री थरार:सिलिंडर गळतीने अचानक भडका, दोन चिमुकल्यांसह 5 जण होरपळले
मुंबईतील आयआयटी पवई कॅम्पसमध्ये गुरुवारी मध्यरात्री एका भीषण दुर्घटनेने मोठी खळबळ उडाली. कॅम्पसमधील वसतिगृह क्रमांक 6 मध्ये सिलिंडरच्या पाइपमधून गॅस गळती होऊन अचानक मोठा भडका उडाला. या आगीत दोन लहान मुलांसह एकूण 5 जण होरपळले आहेत. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून, सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर
Source link
वाळूच्या ट्रॅकची स्कुटीला जोरदार धडक:हवेत उडालेल्या तरुणीने ट्रॅकचा बंपर पकडून वाचवला जीव, श्रीरामपूरमधील घटना