![]()
यंदा पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यात खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले असून, अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट घोंघावत आहे. या भीषण दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे एक विशेष पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. काल रात्री उशिरा या पथकाने विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मराठवाड्यातील पाणीटंचाई आणि पिकांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. आजपासून या पथकाने प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन स्थळपाहणीला सुरुवात केली आहे. देवळी गावातून दौऱ्याला सुरुवात केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील देवळी (देवळी) या गावाला भेट देऊन बांधावर जात पाहणी केली. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि परिस्थिती किती बिकट आहे, याचा प्रत्यक्ष अंदाज घेतला. या दौऱ्याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “हे केंद्रीय पथक संपूर्ण मराठवाड्याची पाहणी करणार आहे. हा दौरा अजून ३-४ दिवस चालेल. त्यानंतर लवकरात लवकर याचा अहवाल तयार करून केंद्र सरकारला पाठवला जाईल. या अहवालानंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून मदतीबाबत पुढील घोषणा केली जाईल.” गेल्या वर्षीच्या मदतीवरून शेतकऱ्यांचा संताप पाहणी दरम्यान एका पत्रकाराने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारला. “गेल्या वर्षीचीच नुकसान भरपाई आणि पीक विम्याची रक्कम अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही, त्याबाबत काय प्रयत्न करणार?” असा सवाल उपस्थित केला गेला. यावर उत्तर देताना स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, “पीक विम्याचे आणि नुकसान भरपाईचे जेवढे पेंडिंग काम होते, ते बहुतांश क्लिअर करण्यात आले आहे. तरीही जर काही शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असतील, तर ते वैयक्तिक पातळीवर सोडवले जातील.” केंद्राला अहवाल सादर करणार या पथकासोबत असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या एका वरिष्ठ सचिवांनीही संवाद साधला. ते म्हणाले, “भारत सरकारची ‘इंटर-मिनिस्ट्रियल टीम’ (आंतर-मंत्रालयीन पथक) आणि राज्य सरकारचे अधिकारी एकत्रितपणे या परिस्थितीची पाहणी करत आहेत. येथील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि दुष्काळाची भीषणता पाहून हा सविस्तर रिपोर्ट थेट भारत सरकारला सादर केला जाईल.” केंद्रीय पथकाच्या या दौऱ्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि भरीव मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ——————— हेही वाचा.. MPSC आंदोलनाचा नववा दिवस: प्रकृती बिघडल्याने 3 विद्यार्थ्यांनी सोडलं उपोषण, रोहित पवार म्हणाले- अध्यक्षांच्या विकेटशिवाय आंदोलनाची सांगता नाही पुण्यात एस. एम. जोशी पुलावर एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांचे गेल्या नऊ दिवसांपासून हक्कांसाठी बेमुदत आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात काही विद्यार्थी अन्नत्याग करून उपोषणाला बसले आहेत. मात्र, या उपोषणाबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे उपोषणाला बसलेल्या सातपैकी तीन विद्यार्थ्यांनी मध्यरात्री आपले उपोषण मागे घेतले आहे. सविस्तर वाचा
Source link
दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक संभाजीनगरात दाखल:पीक विम्यावर अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले- वैयक्तिक तक्रारी सोडवू