![]()
तालुक्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी कृषी विभागाने व्यापक नियोजन केले आहे. यंदा एकूण १७ हजार १२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नानाजी भोये यांनी दिली आहे.
.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या खरीप पेरणी नियोजन अहवालानुसार मागील वर्षी तालुक्यात १६ हजार ७५८.५० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती. यंदा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेती मशागतीसह भाजीपाला लागवडीच्या तयारीलाही वेग दिला आहे.
तालुक्यात भाजीपाला सोबतच पश्चिम भागात भात हे प्रमुख पीक असून, यंदा ६ हजार हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याखालोखाल सोयाबीनसाठी ५ हजार ४०० हेक्टर, भूईमूगासाठी २ हजार ७०० हेक्टर, नागलीसाठी ५५० हेक्टर, मक्यासाठी ६५० हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. कडधान्य पिकांमध्ये तूरीसाठी ६० हेक्टर, उडीदासाठी २१० हेक्टर, मूगासाठी २ हेक्टर तर इतर कडधान्यांसाठी १५० हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. करडईसाठी ४० हेक्टर क्षेत्र राखीव ठेवण्यात आले असून, एकूण तृणधान्य क्षेत्र ८ हजार ४५० हेक्टर, कडधान्य क्षेत्र ४२२ हेक्टर, अन्नधान्य क्षेत्र ८ हजार ८७२ हेक्टर तर गळीत धान्य क्षेत्र ८ हजार १४० हेक्टर राहणार आहे. टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी, फ्लॉवर आदी भाजीपाला पिकांच्या रोपांसाठी विविध नर्सरीमध्ये शेतकऱ्यांनी आगाऊ नोंदणी केली आहे. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे बियाणे, खत व औषध खरेदीसाठीही गर्दी वाढू लागली आहे. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने विविध उपाययोजनांवर भर दिला आहे. मृद आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत माती नमुने संकलन, तपासणी व त्यानुसार खत व्यवस्थापन करण्यात येणार आहे. महाविस्तार अॅपद्वारे किमान ५० टक्के शेतकऱ्यांची फार्मर आय डी नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महाकृषी अॅपवरील १६ खरीप मोहिमांची गावपातळीवर अंमलबजावणी होणार असून, बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रियेलाही प्राधान्य दिले जात आहे. तसेच किमान ३० टक्के शेतकऱ्यांच्या शेतावर रुंद वरंबा व बेड पद्धतीने लागवड, आंतरपीक पद्धती, सापळापीक लागवड तसेच शून्य किंवा कमी मशागत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. भात लागवडीसाठी डी. एस. आर. पद्धतीचा अवलंब करण्यावरही भर दिला जात आहे. फार्मर कॅम्प व डिजिटल शेतीशाळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. दिंडोरी तालुक्यात मिरची लागवडीसाठी शेतकऱ्याने केलेली पूर्वतयारी.
टोमॅटोसाठी प्लास्टिक अच्छादन, बेड तयार करण्याचे काम सुरू दरम्यान, दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवड केली जात असल्याने शेतकरी खरीपपूर्व तयारीत व्यस्त झाले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात विशेषतः टोमॅटो लागवडीसाठी शेतांमध्ये प्लास्टिक अच्छादन टाकून बेड तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. अनेक शेतकरी आधुनिक मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर करत असून, ठिबक सिंचनासह लागवडीची तयारी करत आहेत.
दिंडोरी तालुक्यातील शेतकरी आता आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आहेत. माती परीक्षण, बीजप्रक्रिया, मल्चिंग, डी. एस. आर. पद्धत आणि कमी मशागत तंत्रज्ञानामुळे उत्पादनवाढीस मदत होईल. शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणे व दर्जेदार रोपे वापरून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. – नानाजी भोये, तालुका कृषी अधिकारी