Headlines

दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना:सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू




रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी मोठी आणि दुर्दैवी दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरातून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले ८ विद्यार्थी पाण्यात बुडाले. या घटनेत आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समुद्राच्या पाण्याची खोली आणि लाटांचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आळंदीहून सहलीसाठी दिवेआगरला आले होते मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आळंदी परिसरातील ‘विनर्स’ खासगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे आली होती. सहलीदरम्यान विद्यार्थी समुद्रकिनारी गेले होते. समुद्राचा आनंद घेण्यासाठी काही विद्यार्थी पाण्यात उतरले. मात्र, किनाऱ्याजवळील पाण्याची खोली आणि समुद्रातील प्रवाहाचा अंदाज न आल्याने काही विद्यार्थी अचानक खोल पाण्यात गेले. काही वेळातच विद्यार्थी बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर समुद्रकिनारी एकच गोंधळ उडाला. उपस्थित नागरिक आणि वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावासाठी धाव घेतली. स्थानिक नागरिकांकडून तातडीने बचावकार्य घटनेची माहिती मिळताच दिवेआगर बीचवर कार्यरत असलेल्या ‘महाकाली वॉटर स्पोर्ट्स’च्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी समुद्रात उतरून विद्यार्थ्यांचा शोध सुरू केला. बुडालेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. बचावकार्यादरम्यान आठही विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे आढळून आले. प्राथमिक माहितीनुसार, आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दिवेआगर समुद्रकिनारी शोककळा या दुर्घटनेनंतर दिवेआगर समुद्रकिनारी मोठी गर्दी झाली. एकाच सहलीतील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली असून, प्रशासन आणि पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे. समुद्रकिनारी सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी पाण्यात उतरताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. समुद्रातील पाण्याची खोली, लाटांचा वेग आणि प्रवाह यांचा अंदाज नसल्यास काही क्षणांत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ही बातमी अपडेट होत आहे…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *