![]()
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि वाल्मीक कराड-संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील सुमारे 70 ते 75 टक्के भाग दुष्काळाने होरपळत असल्याचा दावा करत शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली. त्याचवेळी वाल्मीक कराड प्रकरणाचा संदर्भ देत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. टिळक भवन, मुंबई येथे काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी सिरिवेल्ला प्रसाद, विजय वडेट्टीवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची मदत द्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सरकारकडे शेतकऱ्यांसाठी सरसकट हेक्टरी1 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणीही पक्षाने केली आहे. काँग्रेसच्या बैठकीत यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आल्याचे सपकाळ यांनी सांगितले. दुष्काळाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर शेतमजुरांनाही बसला आहे. रोजगार गमावलेल्या शेतमजुरांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच गरजू कुटुंबांना मोफत गहू, तांदूळ, डाळ आणि तेलाचा पुरवठा करण्याबरोबरच 15 मोफत गॅस सिलिंडर देण्याची मागणीही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शुल्कासह एसटी पासचीही मागणी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनाही सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. केवळ परीक्षा शुल्क माफ करून उपयोग नाही, तर विद्यार्थ्यांची ट्यूशन फीही सरकारने भरावी. तसेच एसटीने अप-डाऊन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पास देण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. ‘सरकारला शेतकऱ्यांशी काही देणंघेणं नाही’ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ असताना सत्ताधारी सत्तेत मशगूल असल्याची टीका त्यांनी केली. सरकारने केवळ जीआर काढून आपली जबाबदारी संपवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत आणि पुढे संपूर्ण कर्जमाफी देण्याची काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीत मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवरील खर्चाऐवजी शेतकरी, जनावरे आणि पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. वाल्मीक कराड प्रकरणावरून सपकाळ आक्रमक पत्रकार परिषदेत वाल्मीक कराड यांच्याशी संबंधित प्रश्न उपस्थित होताच हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. वाल्मीक कराड यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर सपकाळ यांनी, “देवेंद्र फडणवीस है तो मुमकिन है!” अशी टीका केली. यानंतर पत्रकारांनी वाल्मीक कराड यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत प्रश्न विचारला. त्यावर सपकाळ यांनी महाराष्ट्राचा गृहविभाग ‘घाशीराम कोतवाल’ चालवत असल्याचा आरोप केला.सरपंचांचा जो खुनाचा जो झालेला प्रकार आहे जो अत्यंत निर्घृण आहे, त्याची हत्या कशी झाली, त्या हत्येचे जे डिटेल्स आहेत हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. ते बोलण्याची, काय-काय झालंय सांगण्याची हिंमत होत नाही. आणि त्या प्रकरणातला आका आणि त्या आकाचे आका हे कोण होते महाराष्ट्राला तेव्हाच कळलं होतं. आणि हे सगळे जे आका आहेत, यांना संरक्षण देणारा महाराष्ट्राचा सर्वात मोठा आका हा देवेंद्र फडणवीस आहे जे आम्ही म्हणत होतो, त्याला या स्वरूपातून सगळ्यात बळ मिळत आहे. मुळात संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना येव्हाना शिक्षा झाली पाहिजे होती, मात्र ती झालेली नाही. आणि त्यांच्या खुनामध्ये लिप्त असणाऱ्या आरोपींना फाईव्ह-स्टार सवलती दिल्या जातायत, हा देवेंद्र फडणवीसांचा खरा चेहरा आहे.” अशी टीका केली. ‘संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा कधी?’ धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या संदर्भातील प्रश्नावर सपकाळ यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख केला. संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगत या प्रकरणातील आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नसल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणातील आरोपींना विशेष सुविधा मिळत असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. ‘कायदा कायद्याचं काम करत नाही’ राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही सपकाळ यांनी जोरदार टीका केली. “कायदा कायद्याचं काम करत नाही. महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेलेली आहेत,” असे ते म्हणाले. ठाण्यातील अलीकडील हत्येचा संदर्भ देत पत्रकारांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सपकाळ यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर सरकारला लक्ष्य केले. सरकारविरोधात काँग्रेसचा आक्रमक पवित्रा दरम्यान, या पत्रकार परिषदेत काँग्रेसने दुष्काळ, शेतकरी कर्जमाफी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, रोजगार आणि कायदा-सुव्यवस्था या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची भूमिका स्पष्ट केली. नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी सिरिवेल्ला प्रसाद यांनीही संघटना मजबूत करून जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे संकेत दिले. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, तसेच वाल्मीक कराड-संतोष देशमुख प्रकरणासह कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. हेही वाचा… रोहित पवारांची केंद्र-राज्य सरकारवर टीका:मतदार यादीतील घोळावरून निवडणूक आयोगावर निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली. देशातील वाढती महागाई, तेलाचे दर, परराष्ट्र धोरण, मतदारयादीतील कथित घोळ तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले. कर्मवीर जयंतीनिमित्त कोपरगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सविस्तर वाचा…
Source link
दुष्काळाने महाराष्ट्र होरपळतोय, तरी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही:वाल्मीक कराड प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर घणाघात