Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:व्यापारी संकुलांचे भिजत घोंगडे; दरमहा 1 कोटींचे नुकसान, भाडेवाढीत अडसर




मागील ३० वर्षांपासून मनपाच्या २७ नॉन बीओटी व ५ बीओटी तत्त्वावरील व्यापारी संकुलांतील दुकानांच्या गाळ्यांची दरवाढ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सातत्याने टळत आहे. बरे हा असा व्यापारी वर्ग आहे, जो वाढीव भाडे सहज भरू शकतो. कारण या दुकानांच्या गाळ्यांमधील व्यवसायातून ते मोठ्या प्रमाणात कमाई करीत आहेत. परंतु, कधी शासनाकडे तक्रार, कधी न्यायालयात दाद मागितल्याने तर कधी शासनाने दरवाढीला स्थगिती दिल्यामुळे व्यापारी संकुलांच्या दरवाढीचे भिजत घोंगडे अजूनही कायम आहे. ३० वर्षांपासून व्यापारी संकुलातील दुकानांच्या गाळ्यांवर एकही रुपयाची दरवाढ झाली नसल्यामुळे महानगरपालिकेला दरमहा किमान १ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. कारण मनपाची ३२ व्यापारी संकुले असून यात १५०० वर दुकानांचे गाळे आहेत. यापासून मनपाला आता एकही रुपया भाडे मिळत नाही. ज्यावेळी भाडे निश्चित होईल, त्यावेळी थकीत भाडेही वसूल केले जाईल, असे महानगरपालिकेच्या बाजार व परवाना विभागाने स्पष्ट केले. महानगरपालिकेच्या काही व्यापारी संकुलांचा भाडेपट्टा (लीज) २०१९ मध्ये संपला. त्याचप्रमाणे २०२५ मध्ये ५ बीओटी व २७ नॉन बीओटी, अशी एकूण ३२ व्यापारी संकुलातील गाळ्यांची लीज संपुष्टात आली आहे. यासंदर्भात शासनाने आधी २०१९ मध्ये रेडिरेकनरच्या ०.७ टक्के दराने भाडेवाढ करण्याचे निर्देश संकुल समितीला दिले होते. त्यानंतर २०२५ मध्ये शासनाने यात दुरुस्ती केली. त्यानुसार महानगरपालिका ज्या दराने मालमत्तांवर कर आकारते, त्याच्या दुप्पट दराने व्यापारी संकुलातील दुकानांच्या गाळ्यांवर भाडे आकारण्यात यावे, असे सुचवण्यात आले. लिलावासाठी आमसभेत प्रस्ताव व्यापारी संकुलातील दुकानांच्या गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी महानगरपालिकेच्या आमसभेत प्रस्ताव ठेवण्याची योजना स्थायी समिती सभापतींनी तयार केली आहे. कारण सध्यातरी या व्यापारी संकुलांपासून मनपाच्या हाती काहीच येत नाही. जर दुकानांच्या गाळ्यांचा लिलाव केला, तर मनपाला मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळेल. कारण मनपाची व्यापारी संकुले मुख्य बाजारपेठेत आहेत. २०१७ मध्ये भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला होता ^शहरातील व्यापारी संकुलांमधील दुकानांच्या गाळ्यांची लीज संपणार असल्यामुळे तसेच या गाळ्यांपासून मनपाला उत्पन्न वाढवायचे असेल, तर रेडिरेकनरनुसार भाडेवाढ निश्चित करण्यात यावी, असा प्रस्ताव तत्कालीन सभागृह नेते तुषार भारतीय यांनी १६ जून २०१७ रोजी झालेल्या आमसभेत ठेवला होता. – चेतन गावंडे, सभागृह नेते, मनपा. रेडिरेकनरच्या ०.७ टक्के दरापेक्षा जास्त भाडे हवे ^शासनाच्या जीआरनुसार रेडिरेकनरच्या ०.७ टक्के दराने व्यापारी संकुलातील दुकानांच्या गाळ्यांचे भाडे निश्चित करण्यात यावे. किंवा वर्तमान मालमत्ता कराचा जो दर आहे, त्याच्या दुप्पट दराने भाडे आकारावे, असे शासनाने म्हटले आहे. आम्हालाही वाढीव दराने भाडेवाढ हवी. – अविनाश मार्डीकर , सभापती, स्थायी समिती, मनपा. प्रशासकांच्या कार्यकाळात सूचना, हरकतींवर सुनावणी महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासक काळात ३१ मार्च २०२२ नंतर व्यापारी संकुलातील दुकानांच्या गाळ्यांची भाडेवाढ रेडी रेकनर दरांनुसार प्रस्तावित करण्यात आली होती. प्रस्तावित नवीन भाडेवाढीला स्थानिक गाळेधारकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. जुन्या करारांनुसारच नाममात्र भाडेवाढ करावी, अशी मागणी करत हरकती नोंदवण्यात आल्या होत्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *