![]()
मंगलाष्टकांचा स्वर, भक्तीमय वातावरण आणि पारंपरिक विधींची रेलचेल… अशा मंगलमय वातावरणात शिर्डीतील श्री द्वारकामाई मंदिरात तुळशी विवाहाचा सोहळा रविवारी सायंकाळी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने पार पडला. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित या सोहळ्य
.
सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत द्वारकामाईच्या सभामंडपात धार्मिक विधींना प्रारंभ झाला. श्रीगणेश पूजनानंतर तुळस आणि भगवान विष्णू यांच्या विवाहाचे पारंपरिक विधी पार पडले. आरती आणि नैवेद्य अर्पण करून या मंगलसोहळ्याची सांगता झाली. यावेळी मंदिर परिसरात भक्ती आणि मांगल्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
तुळशी विवाह म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे, तर भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, परंपरा आणि निसर्गपूजेचा सुंदर आविष्कार! पिढ्यान्पिढ्या जपली गेलेली ही परंपरा शिर्डीच्या पवित्र भूमीतही संस्थानच्या वतीने दरवर्षी भक्तिभावाने साजरी केली जाते. यानिमित्ताने द्वारकामाईत दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांनाही या मंगलक्षणांचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. या प्रसंगी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी तथा प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, मंदिरातील पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.