![]()
जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील धोंडाबाई या वृद्ध महिलेच्या व्यथेची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. वृद्धापकाळ, आर्थिक परिस्थिती आणि कुटुंबातील अडचणींमुळे या महिलेसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. श्रावणबाळ योजनेचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने आणि रेशनमधून अन्नधान्य उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. या परिस्थितीची माहिती एबीपी माझाने वृत्ताच्या माध्यमातून समोर आणली होती. या वृत्ताची धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली असून, संबंधित वृद्ध महिलेला अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासह तिच्या घराची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. धोंडाबाई यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांच्यासोबत राहणारा मुलगाही काम करण्यास सक्षम नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी आणि जगण्याचा संघर्ष त्यांच्या समोर उभा राहिला होता. वयोमानामुळे काम करणे शक्य नसताना शासकीय योजनांचा लाभही वेळेवर मिळत नसल्याने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. श्रावणबाळ योजनेचे अनुदान आणि रेशनमधून मिळणारे धान्य या दोन्ही गोष्टींचा लाभ मिळत नसल्याची व्यथा त्यांनी मांडली होती. पालकमंत्र्यांकडून महिलेची दखल; घेतले दत्तक या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धोंडाबाई यांना मदतीचा हात दिला आहे. या महिलेला दत्तक घेतल्याचे सांगत तिच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक सूचना संबंधित पदाधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलेला नियमित अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाईल. तसेच तिच्या राहत्या घराची दुरुस्तीही करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून मूलभूत गरजांसाठी संघर्ष करणाऱ्या या वृद्ध महिलेला काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. महिलेच्या परिस्थितीची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनही सक्रिय झाले असून, तिच्या अन्नधान्याचा प्रश्न आणि विविध शासकीय योजनांच्या लाभासंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. 308 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबतही प्रताप सरनाईक यांनी भूमिका मांडली. राज्यातील 308 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, शासनाच्या निर्देशांनुसार काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बेकायदा बाइक टॅक्सी सेवांवर कठोर कारवाईचा इशारा रॅपिडो, ओला आणि उबर या कंपन्यांच्या दुचाकी सेवांबाबत बोलताना सरनाईक यांनी दुचाकी टॅक्सी चालवण्यास परवानगी दिलेली नसल्याचे सांगितले. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित अडचणी निर्माण होत असतील किंवा सेवा बेकायदा पद्धतीने सुरू असेल, तर संबंधित वाहने जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. इलेक्ट्रिक दुचाकींना मात्र परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आरटीओ कार्यालयात दुसऱ्या दिवशी बैठक आयोजित करण्यात आली असून, कंपन्यांना लेखी सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात अशा प्रकारच्या सेवांविरोधात कारवाई सुरू असून, भविष्यात राज्यभरातही कारवाई सुरू राहील. कंपन्यांनी शासनाला गृहीत धरू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही सरनाईक यांनी दिला. जनावरांच्या नुकसानीसाठी वैयक्तिक मदत; आगग्रस्तांना अतिरिक्त मदतीची मागणी दरम्यान, शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या तीन गायींच्या नुकसानीबाबतही सरनाईक यांनी माहिती दिली. संबंधित शेतकऱ्याला मदत म्हणून स्वतःच्या स्तरावरून दोन गायी खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य केल्याचे त्यांनी सांगितले. धाराशिवमध्ये ग्राउंड प्लस वन इमारतीला आग लागल्याच्या घटनेबाबतही त्यांनी भूमिका मांडली. या घटनेतील बाधितांना सध्या 9 लाख रुपयांची मदत मिळत असल्याचे सांगत, ही मदत वाढवून प्रत्येकी 5 लाख रुपयांची अतिरिक्त मदत देण्यात यावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या वतीनेही 5 लाख रुपयांची मदत देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. एकीकडे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने वृद्ध महिलेवर उपासमारीची वेळ आली होती, तर दुसरीकडे तिची व्यथा प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जाग आली. आता धोंडाबाई यांना अन्नधान्य आणि घराच्या दुरुस्तीची मदत प्रत्यक्षात किती लवकर मिळते, याकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा… 4 दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आलेल्या आरोपीवर पुण्यात कोर्टाबाहेरच जीवघेणा हल्ला:गोळीबारानंतर कोयत्याने दोन्ही हात छाटले; सुप्रिया सुळे, वडेट्टीवारांचा गृहखात्यावर संताप अवघ्या 4 दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या एका हत्या प्रकरणातील आरोपीवर पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला झाला. 20 एप्रिल 2025 रोजी कात्रज येथील संतोषनगरमध्ये झालेल्या शुभम सुभाष चव्हाण याच्या हत्येतील मुख्य आरोपी मंदार मारुती किवळे याच्यावर बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आला असता 6 ते 7 हल्लेखोरांनी सापळा रचून आधी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या रक्तरंजित थरारानंतर पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेवरून राजकारण तापले असून खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. याप्रकरणी 7 संशयित आरोपींची नावेही समोर आली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
धाराशिवच्या धोंडाबाईंना पालकमंत्र्यांचा मदतीचा हात:अन्नधान्य मिळणार, घराचीही होणार दुरुस्ती