Headlines

धार्मिक:ग्रामदैवत अकलाई देवीची भंडाऱ्यासह दहीभाताच्या नैवेद्यानंतर झाली महापूजा




अकलूजचे ग्रामदैवत श्री अकलाई देवीचा पारंपरिक भंडारा (यात्रा) शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. यात्रेनिमित्त अकलूजसह परिसरातील हजारो देवीभक्तांनी दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. महापूजा, पालखी सोहळा, आरती, महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. श्री अकलाई देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आषाढी पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी भंडारा (यात्रा) साजरा करण्याची परंपरा आहे. यंदा पौर्णिमेनंतरच्या पहिल्या शुक्रवारी हा सोहळा पार पडला. पहाटे देवस्थान ट्रस्ट व गुरव परिवाराच्या वतीने देवीची महापूजा करण्यात आली. महापूजेनंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील यांच्यासह मोहिते-पाटील, माने-पाटील, माने-देशमुख कुटुंबीय तसेच अकलूज परिसरातील भाविकांनी श्री अकलाई देवीचे दर्शन घेतले. दुपारी ११ वाजता मानकरी फुले परिवाराच्या वाड्यातून देवीच्या पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. गोंधळी, आराधी, पोतराज, फुले परिवार आणि शेकडो देवीभक्तांच्या सहभागामुळे पालखी सोहळ्याला विशेष उत्साह लाभला. रामायण चौक, अकलाई कॉर्नर मार्गे पालखी मंदिरात दाखल झाली. मंदिरात मुख्य मंदिर विश्वस्त जयसिंह मोहिते-पाटील व सुलक्षणादेवी मोहिते-पाटील यांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर दहिभात महापूजा आणि महाआरती संपन्न झाली. सायंकाळी सहकार महर्षी साखर कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या हस्ते दीपमाळ प्रज्वलित करण्यात आली. शनिवारी दुपारी २ वाजता शहरातून देवीच्या छबिन्याची सवाद्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असून, या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन भाविकांना करण्यात आले. समितीच्या वतीने यात्रेचे नियोजन यशस्वी करण्यासाठी विविध सामाजिक संस्था, सहकारी व शैक्षणिक पदाधिकारी तसेच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची चोख व्यवस्था सांभाळली. महिला, ज्येष्ठांसाठी विशेष दर्शन व्यवस्था दुपारी १२ ते २ या वेळेत महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह आलेल्या मातांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना कोणताही त्रास न होता शांततेत दर्शन घेता आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *