![]()
प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेंतर्गत धुळे व नाशिक जिल्ह्यात पीकविमा हप्त्यात मोठी तफावत असल्याचा दावा करत, धुळे जिल्ह्याप्रमाणेच नाशिक जिल्ह्यासाठीही एचडीएफसी अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करावी, अशी मागणी शेतकरी मित्र तथा भाजप किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदू शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दत्ताजी भरणे आणि राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्याकडे केली आहे. खरीप २०२६ व रब्बी २०२६-२७ हंगामासाठी शासनाने जिल्हानिहाय विमा कंपन्या व प्रीमियम दर निश्चित केले आहेत. त्यानुसार धुळे जिल्ह्यासाठी एचडीएफसी अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, प्रीमियम दर २.११ टक्के आहे. तर नाशिक जिल्ह्यासाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, प्रीमियम दर ३.४७ टक्के निश्चित करण्यात आला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक पिकांसाठी धुळेच्या तुलनेत अधिक विमा हप्ता भरावा लागत असल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे. या वाढीव हप्त्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याने नाशिक जिल्ह्यासाठीही धुळेप्रमाणे एचडीएफसी अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करून विमा हप्त्यावरील आर्थिक भार कमी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हप्त्यात मोठी तफावत धुळे जिल्ह्यात भातासाठी सुमारे १३७.५० रुपये हप्ता आकारला जातो, तर नाशिकमध्ये १,१५० रुपये भरावे लागतात. ज्वारीसाठी धुळ्यात ८२.५० तर नाशिकमध्ये १,६५०, नाचणीसाठी धुळ्यात १०० तर नाशिकमध्ये १,६००, सोयाबीनसाठी धुळ्यात १५६ तर नाशिकमध्ये ९००, मुगासाठी धुळ्यात १,५०० तर नाशिकमध्ये २,३५०, तर उडीदासाठी धुळ्यात १,३५० आणि नाशिकमध्ये ३,१२५ रुपयांचा हप्ता असल्याचा दावा करण्यात आला आहे. कापूस, मका व कांदा पिकांमध्येही मोठी तफावत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दखल घेण्याची अपेक्षा पीक विमा हप्त्यातील फरकामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्ताजी भरणे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन नाशिक जिल्ह्यासाठीही धुळेप्रमाणे एचडीएफसी अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करावी. – बिंदू शर्मा, प्रदेश महामंत्री, भाजप किसान मोर्चा
Source link
धुळेप्रमाणे नाशिकलाही समान विमा दर द्या:भाजप किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदू शर्मा यांची निवेदनाद्वारे मागणी