![]()
देशातील पहिली स्वदेशी राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या अहिल्यानगर विभागातर्फे आयोजित भव्य ‘एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कार्यक्रम’ व उद्यमिता मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात जिल्ह्यातील नवउद्योजकांसाठी तब्बल ६० कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. एमआयडीसी परिसरात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन क्षेत्रीय प्रबंधक नरेशकुमार दुबे आणि ‘आमी’चे अध्यक्ष जयरथ खकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी सतीश गवळी, प्रफुल्ल पारखे, डीआयसीच्या निरीक्षक दिशा दौड, मिलिंद कुलकर्णी, मुख्य प्रबंधक प्रमोद दहिफळे उपस्थित होते. नरेशकुमार दुबे म्हणाले, “उद्योजक हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी देशभरातील १२० शाखांमध्ये एकाच वेळी हा उपक्रम राबवण्यात आला असून, अहिल्यानगर विभागात सुपा व नगर एमआयडीसी येथे हे कार्यक्रम घेण्यात आले.” ‘आमी’चे अध्यक्ष जयरथ खकाळ यांनी मार्गदर्शन करताना, पारदर्शक व कमी व्याजदराच्या कर्ज सुविधेचे कौतुक केले. वेळेत कर्जपरतफेड करून पत वाढवण्याचे आवाहन केले. उद्योजकांसाठी कर्ज योजनांची माहिती मेळाव्या दरम्यान नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकेच्या विविध व्यावसायिक कर्ज योजनांची माहिती लघुपटाद्वारे देण्यात आली. उद्योग क्षेत्राशी संबंधित योजना व बँकिंग सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून उद्योजकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. मुख्य प्रबंधक प्रमोद दहिफळे व धिमान चौधरी यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रसाद जांगल यांनी आभार मानले.
Source link
नवउद्योजकांसाठी तब्बल 60 कोटींच्या कर्जास मंजुरी:सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे "एमएसएमई क्रेडिट आऊटरीच'' मेळावा