Headlines

नसरापूर प्रकरणाचा तपास आता SIT कडे:दोन महिला अधिकाऱ्यांसह 6 वरिष्ठ पोलिसांचे पथक करणार तपास; राज्यात संतापाची लाट




नसरापूर येथे 65 वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. जनक्षोभ इतका तीव्र होता की, शनिवारी संतप्त नागरिकांनी पुणे येथील नवले पूल परिसरात रस्ता रोको आंदोलन करत बंद पाळला होता. नागरिकांच्या भावना आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. या पथकात पुणे ग्रामीण पोलिसांमधील सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या एसआयटीमार्फत पुराव्यांची साखळी भक्कम करून आरोपीला कठोर कायदेशीर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आरोपीचा न्यायालयात निर्लज्जपणा भोर तालुक्यातील नसरापूर येथील चार वर्षांच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम आरोपीला पुणे न्यायालयाने 7 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘भांडणातून गोवल्याचा’ धक्कादायक बनाव रचला, मात्र पोलिसांनी सादर केलेले प्राथमिक पुरावे आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत त्याला पोलिस कोठडीत पाठवले आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला “काही तक्रार आहे का?” अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने अत्यंत निर्लज्जपणे उत्तर देत म्हटले की, “किरकोळ भांडणातून मला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले आहे.” आपल्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. मात्र, तपासातील निष्पन्न तथ्ये आणि चिमुकलीचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला, त्यावरून त्याचा हा बनाव न्यायालयात टिकू शकला नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *