![]()
नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैष्णवी देवी नगर परिसरातील विस्टा टॅटू स्टुडिओजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी १५१ ग्रॅम ‘एमडी’ (मेफेड्रॉन) पावडर जप्त केली, ज्याची बाजारातील किंमत सुमारे ३० लाख २० हजार रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद नियाज समसूल अन्सारी आणि मोहम्मद असलम समसुल अन्सारी (दोघे रा. राजनगर वाठोडा लेआऊट, भांडेवाडी) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तपासात हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. मोहम्मद नियाजवर यापूर्वी अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे, तर मोहम्मद असलमवर हत्येचा गंभीर गुन्हा नोंद आहे. या कारवाईदरम्यान त्यांचा साथीदार विशाल उर्फ फल्ली गुप्ता (रा. वाठोडा) फरार झाला आहे. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, दरोडा आणि आर्म ॲक्टसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी ३० लाख २० हजार रुपयांच्या एमडी पावडरसह, तस्करीत वापरलेली १२ लाखांची होंडा सिटी कार, एक लाख रुपयांची सुझुकी ॲक्सेस मोपेड, ५० हजार रुपयांचे दोन मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि रोख रक्कम असा एकूण ४३ लाख ७४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भांडेवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी हे ड्रग्ज कुठून आणले आणि कोणाला विकणार होते, याचा सखोल तपास गुन्हे शाखा करत आहे.
Source link
नागपुरात 30 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त:गुन्हे शाखेची कारवाई, 43 लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक