![]()
सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौकात महापालिकेमार्फत नाट्यगृह उभारणीचे काम अखेर पूर्ण झाले आहे. सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून स्थापत्य काम केले आहे. आता नाट्यगृहातील आसन व्यवस्था, फर्निचर व इतर अंतर्गत कामांसाठी १२ कोटी रुपयांची निविदा मंजूर केली आहे. मात्र, महापालिकेला हा खर्च स्वनिधीतून करावा लागणार आहे. सद्यस्थितीत महापालिकेकडे प्रत्यक्ष निधी उपलब्ध नसल्याने हा निधी उपलब्ध करून कामे पूर्ण होईपर्यंत सुमारे दोन वर्षांची प्रतीक्षा कलावंतांना करावी लागणार आहे. सावेडी क्रीडा संकुल जमीनदोस्त करून त्याजागी भव्य नाट्यगृह उभारणीचा प्रस्ताव सन २०१० मध्ये मंजूर केला होता. सन २०१३ मध्ये या नाट्यगृहाच्या कामाची निविदा प्रक्रिया होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आला. सुरुवातीला ५०० आसन क्षमता व ५.७४ कोटींच्या खर्चाच्या या कामात बदल करून १ हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह प्रस्तावित झाले. त्यासाठी स्थापत्य कामाची ७.२२ कोटींचा सुधारित खर्च मंजूर केला. शासनाकडून या कामासाठी ६० लाख, मनपा निधीतून ३.१५ कोटी व आमदार संग्राम जगताप यांनी नियोजन मंडळातून ५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. यातून नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण केले आहे. आता अंतर्गत कामांसाठी १२ कोटींचा खर्च मनपा स्वनिधीतून करणार आहे. मनपाची आर्थिक स्थिती पाहता निधी उपलब्ध होऊन कामे पूर्ण होण्यासाठी व नाट्यगृह खुले होण्यासाठी दोन वर्षे प्रतीक्षाच करावी लागणार आहे. { पार्किंग : १०५८.७८ चौ.मी. { तळमजला : ३०२५.१३ चौ.मी. { पहिला मजला : १८५०.४६ चौ.मी. { एकूण क्षेत्र : ५९३४.३७ चौ.मी. . प्रशस्त पार्किंगसह तळमजला व बाल्कनी फ्लोअर (पहिला मजला) .संपूर्ण वातानुकुलीत (१ हजार आसन क्षमता) . तळमजल्यामध्ये १० मीटर बाय २० मीटरचे वुडन फ्लोरिंग . स्टेज, प्रशस्त बॅकस्टेज, ग्रीन रूम , आकर्षक आसन व्यवस्था . अॅकॉस्टीक इंटिरियर, कॅफेटेरिया प्रस्तावित कामे टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध केला जाईल नाट्यगृहाचे अनेक वर्षांपासून रखडलेले स्थापत्य काम मार्गी लागले आहे. आता आसन व्यवस्था, फर्निचर व इतर कामांसाठी १२ कोटींचा खर्च असून महापालिकेच्या निधीतून ही कामे पूर्ण केली जातील. महापालिका आर्थिक अडचणीत असली तरी, टप्प्याटप्प्याने हा निधी उपलब्ध करण्यात येईल व सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. यशवंत डांगे, आयुक्त, महापालिका नाट्यगृहाचे प्रस्तावित बांधकाम
Source link
नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण, अंतर्गत कामांसाठी पुन्हा 2 वर्षांची प्रतीक्षा:आसन व्यवस्था, फर्निचरसाठी 12 कोटींच्या निधीची गरज