Headlines

स्वराज्यासाठी शस्त्रे तयार करणाऱ्या लोहार समाजाला शासन देणार साथ:सुपा एमआयडीसीत जागेसाठी उद्योगमंत्र्यांशी चर्चा करणार- मंत्री संजय राठोड




छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात गड-किल्ल्यांवरील सैन्यासाठी शस्त्रास्त्रे घडविण्यापासून ते शेतकऱ्यांच्या अवजारांची निर्मिती करण्यापर्यंत लोहार समाजाने ऐतिहासिक योगदान दिले आहे. मात्र, आधुनिक यांत्रिकीकरणामुळे पारंपरिक व्यवसाय संकटात आला आहे. समाजासमोर रोजगार आणि आर्थिक स्थैर्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोहार समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर ठोस पाठपुरावा करून समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मृद व जलसंधारण मंत्री तथा भटके-विमुक्त चळवळीचे नेते संजय राठोड यांनी दिली. अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी लोहार समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. या प्रसंगी सचिव मुकुंद आडेवार, राहुरी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष दशरथ पोपळघट, जिल्हा लोहार समाज संघटनेचे अध्यक्ष भास्कर पोपळघट, माजी नगरसेवक संतोष पोपळघट, संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विजय जगताप, सदस्य बाळासाहेब इघे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती पोपळघट, प्रकाश इघे, रावराहेब थोरात, प्रा. संजय विघे, बाळासाहेब पोपळघट, पारनेर तालुका संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग भालके, जयकुमार हरेल, दत्तात्रय पोपळघट रामदास गायकवाड आदी उपस्थित होते. मंत्री राठोड म्हणाले, मी मंत्री असलो तरी तुमच्यातलाच एक घटक आहे. समाजाच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा वहिनी पवार यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळात पाठपुरावा करणार आहे. समाजातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळणे आवश्यक आहे. यावेळी समाजातर्फे मंत्री राठोड यांना निवेदन देण्यात आले. त्यात सुपा एमआयडीसीत दोन एकर जागा उपलब्ध करावी, महामंडळाच्या कर्जाची मर्यादा एक लाखांवरून पाच लाख रुपये करावी, कर्जप्रकरणातील जाचक अटी रद्द कराव्यात, तरुणांना रोजगार व शासकीय सेवेत संधी द्यावी, दुष्काळग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत करावी, शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा आदी मागण्या केल्या. पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीमध्ये लोहार समाजाच्या सामूहिक उद्योगासाठी दोन एकर जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर बैठकीत विशेष चर्चा झाली. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. सुपा एमआयडीसीत औद्योगिक विकासाची संधी!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *