संसदेतील लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) भाजपप्रणित ‘एनडीए’ (NDA) आघाडीत सामील होणार असल्याच्या आणि त्या बदल्यात खासदार सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळणार अ
.
मला 4 जेपीसी आणि पॉलिसी मेकिंगवर कोणीच प्रश्न विचारत नाही, याचे दुःख!
कालपर्यंत केंद्रीय मंत्री आणि आता मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. “गेले 12 वर्षे माझा शपथविधी सुरू आहे, माझ्यावर अन्याय करू नका. 2014 पासून मी मुख्यमंत्री होतेय. मला या कोणत्याही राजकीय कथांमध्ये अजिबात रस नाही.”

4 संयुक्त संसदीय समित्यांवर महत्त्वाचे काम सुरू
“मला फक्त एकाच गोष्टीचे दुःख वाटते की, ज्या धोरणनिर्मितीसाठी (पॉलिसी मेकिंग) बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला विश्वासाने दिल्लीत निवडून पाठवले आहे, त्याबद्दल मला कोणीच गांभीर्याने विचारत नाही. मी सध्या 4 संयुक्त संसदीय समित्यांवर (JPC) काम करत असून देशाचे आर्थिक धोरण ठरवणाऱ्या संसदीय वित्तीय समितीमध्येही (फायनान्स कमिटी) माझा समावेश आहे.”
सामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या विधेयकांवर चर्चा
“या 4 जेपीसींमध्ये देशपातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या विधेयकांवर आणि स्वयंसेवी संस्थांना (NGO) मिळणाऱ्या निधीवर चर्चा सुरू आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या-आमच्या आयुष्यावर होणार आहे. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे; या गंभीर प्रश्नांवर कोणी प्रश्न विचारला, तर मला मनापासून आनंद होईल,” असे सुळे यांनी स्पष्ट केले.
कराडला येणे म्हणजे माहेरी आल्यासारखे
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त कराडमध्ये आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. “आदरणीय पवार साहेब केंद्रात मंत्री असतानाही त्यांनी हे 2 दिवस कधीच चुकवले नाहीत. चव्हाण सेंटरच्या कामासाठी वर्षातून 2 ते 3 वेळा माझे कराडला येणे होतेच. कराडला येणे म्हणजे माझ्यासाठी माहेरी आल्यासारखे असते. येथील चव्हाण साहेबांचे घर आणि वेणूताईंच्या ट्रस्टने जतन केलेला ठेवा, पत्रे व पुस्तकांचे संपूर्ण डिजिटलायझेशन यशवंतराव चव्हाण सेंटरने केले आहे; महाराष्ट्रातील जनतेने येथे येऊन नक्की प्रेरणा घ्यावी.”
अजितदादांच्या आठवणीने भावुक
“गेले 2 ते 3 वर्षे अजितदादा येथे नियमितपणे येत होते. मात्र, आज ते आपल्यात नाहीत हे मोठे दुर्दैव आहे. येत्या 28 तारखेला दादाला जाऊन 10 महिने पूर्ण होतील; आजही अनेक वेळा दादा आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. दरम्यान, प्रीतीसंगमाच्या साक्षीने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, या प्रश्नावर त्यांनी “राम कृष्ण हरी” म्हणत अधिक भाष्य करणे टाळले.
उद्या मुंबईत दुष्काळाचा महाआढावा; रोहित पवारांविषयीच्या चर्चा ‘हास्यास्पद’
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पक्षांतर्गत चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “येथे आल्याआल्या आमच्या नवनिर्वाचित आमदारांनी टँकर आणि चाऱ्याच्या गंभीर टंचाईची माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उद्या मुंबईत सर्व जिल्हाध्यक्ष, नेते आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली आहे. राज्यात किती टँकर सुरू आहेत, चारा छावण्यांची काय मागणी आहे आणि सरकारने जाहीर केलेले 5000 रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत का, याचा तालुका व मतदारसंघनिहाय अहवाल मी आज बसून तयार करणार असून उद्या सादर करणार आहे. कालच मी तामिळनाडूमध्ये दुष्काळावर भाषण करण्यासाठी गेले होते आणि आज रात्री मुंबईला परतणार आहे.”
रोहित पवारांच्या गुप्त बैठकीच्या चर्चा फेटाळल्या
रोहित पवार पक्षात एकाकी पडल्याच्या आणि गुप्त बैठका घेतल्याच्या चर्चांवर सुळे म्हणाल्या की, “हे अत्यंत हास्यास्पद आहे. काही लोक जाणीवपूर्वक विशिष्ट अजेंडा राबवून असे आभास निर्माण करत आहेत. दुष्काळ आणि संसदीय कामांचा इतका प्रचंड व्याप आहे की अशा ‘गॉसिप’कडे लक्ष द्यायला आम्हाला अजिबात वेळ नाही.”
मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, गोकुळचा वाद संवादातून मिटवा
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत 80 लाख रुपये वकिलांच्या फीवर खर्च झाल्याच्या आणि न्यायालयीन लढाईच्या वादावर सुप्रिया सुळे यांनी सरकारला साद घातली. “बंटीदादा (सतेज पाटील) आणि माझे भावासारखे कौटुंबिक संबंध आहेत; मी पूर्ण ताकदीने त्यांच्या व त्यांच्या टीमच्या पाठीशी उभी आहे. यशवंतराव चव्हाण यांनी रुजवलेली सहकार चळवळ जिवंत राहिली पाहिजे. निवडणुकीत एखादे मत कमी-जास्त झाले तर ‘जो जीता वही सिकंदर’ म्हणत कोर्टात जाण्यापेक्षा सरकारने समंजसपणा दाखवून चर्चेतून मार्ग काढायला हवा होता. आज शेतकरी आणि दूध व्यवसाय संकटात आहे; त्यामुळे या पवित्र वास्तूवरून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून विनंती करते की, गोकुळचा प्रश्न चर्चेतून सोडवावा.”
पहलगाम हल्ल्याप्रमाणेच दुष्काळावर एकत्र येण्याची गरज
“पहलगामवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा शरद पवार हे सरकारच्या पाठीशी उभे राहणारे पहिले नेते होते आणि आम्ही 100 खासदारांनी 5 ते 6 देशांत जाऊन भारताची बाजू मांडली. आज दुष्काळाचे संकट महाराष्ट्रावर आले आहे; शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना 2 पत्रे लिहिली असून बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील आणि रोहित पवार सतत पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे ही राजकारण करण्याची नव्हे, तर मायबाप जनतेची सेवा करण्याची वेळ आहे.”
25 ते 30 टक्के कमिशनच्या चर्चेवर चिंता
राजकारणात 25 ते 30 टक्के कमिशन घेतल्याशिवाय कामे होत नाहीत, या संजय राऊत यांच्या आरोपावर सुळे म्हणाल्या की, “अशी अस्वस्थता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात दबक्या आवाजात चर्चेत आहे; काल तामिळनाडूच्या वर्तमानपत्रांतही अशा बातम्या होत्या. जागतिक युद्धे, तेल आणि सोने-चांदीच्या दरातील चढ-उतार पाहता आपण सर्वांनी मिळून गुंतवणूक आणि रोजगार वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”
महायुतीकडे 238 आमदारांचे भक्कम पाठबळ, पण सुप्रियाताई एनडीएमध्ये आल्यास स्वागत – सुनील तटकरे
दुसरीकडे, सुप्रिया सुळे यांच्या संभाव्य मुख्यमंत्रीपदाच्या आणि एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. “जोपर्यंत या विषयावर कोणीही अधिकृतपणे बोलत नाही, तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही. राज्यातील आमचे महायुतीचे सरकार अत्यंत मजबूत असून आमच्याकडे 238 आमदारांचे संख्याबळ आहे. यामध्ये भाजपचे 132 आमदार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 60 आमदार आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट आहे.”
4 पट लोकसंख्यावाढीचा उल्लेख
“येणाऱ्या डिलिमिटेशन विधेयकाला सुप्रियाताई सुळे या लोकसंख्येचा विचार न करता सर्व राज्यांत समान 50 टक्के जागावाढीच्या अटीवर पाठिंबा देणार असतील आणि एनडीएचा घटक बनणार असतील, तर मी त्यांचे स्वागतच करेन. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात ज्यावेळी लोकसभेच्या जागा निर्धारित करण्यात आल्या होत्या, तेव्हापासून आजपर्यंत देशाची लोकसंख्या 4 पटीने वाढली आहे,” असेही सुनील तटकरे यांनी नमूद केले.
———————————————————-
हेही वाचा…
समाज कल्याणच्या कामासाठी मंत्र्यांनी 72व्या मजल्यावर 5 कोटींची लाच मागितली: लहान कामांसाठीही मंत्री पैसे मागताय- संजय राऊत

लातूरमधील संस्थेच्या 25 कोटींच्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी समाज कल्याणमधील कामासाठी त्या खात्याच्या मंत्र्यांनी आपल्या 72 व्या मजल्यावरील खासगी घरी बोलावून स्वतः पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत राऊत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. रक्कम न दिल्याने प्रस्ताव रखडल्याचा दावा राऊत यांनी केला असून आता या आरोपावर सामाजिक न्यायमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी