राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (25 नोव्हेंबर 2026) 9 मंत्र्यांच्या दुष्काळ निवारण उपसमितीची साप्ताहिक बैठक होत असून, त्यापूर्वी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. दिव
.
दुष्काळावर राजकारण नको
दुष्काळ समितीच्या बैठकीपूर्वी बोलताना बावनकुळे यांनी विरोधकांच्या आंदोलनावर आणि चर्चेच्या प्रस्तावांवर सकारात्मक भूमिका मांडली. दुष्काळाच्या संदर्भात दर आठवड्याला होणाऱ्या बैठकीत चालू आणि पुढील आठवड्यातील उपाययोजना, जिल्ह्यांचे अहवाल, पाणी व चारा टंचाई, कर्जमाफी आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अरेरावीचा आढावा घेतला जातो. आमचे सर्व 9 मंत्री या बैठकीला उपस्थित असतात.
रोहित पवारांनी नोटीस द्यावी, आम्ही मार्ग काढू
रोहित पवार यांनी मोर्चाची सूचना दिली आहे. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र सरकार त्यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यास सकारात्मक असताना मोर्चा कशाला? तो राजकीय असेल तर ठीक आहे, पण आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना संभ्रमात टाकणे चुकीचे आहे. रोहित पवारांनी केवळ नोटीस प्रसिद्ध न करता सरकारकडे अधिकृत नोटीस द्यावी, आम्ही नक्की बैठक घेऊन मार्ग काढू.
शरद पवार गटाच्या निवेदनावरही कारवाई करू
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आज बैठक घेऊन दुष्काळाचा आढावा घेणार असून शरद पवार मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. यावर प्रतिक्रिया देताना, “विरोधक असो वा सत्ताधारी, कोणाचेही निवेदन आल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर नक्की कारवाई करतील आणि आमच्या उपसमितीच्या अधिकारात प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

30 नोव्हेंबरपर्यंत 20 ते 22 लाख शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण करा
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये जमा होणार होते, मात्र अद्याप अनेक शेतकरी मदतीपासून वंचित असल्याच्या प्रश्नावर महसूलमंत्र्यांनी प्रशासकीय वेग वाढवल्याची माहिती दिली. फार्मर आयडी (Farmer ID) आणि केवायसी पूर्ण नसल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये जमा होऊ शकले नाहीत. राज्यातील अशा उर्वरित 20 ते 22 लाख शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तातडीने जनरेट करणे, केवायसी आणि पीक पाहणी 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे कडक आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांचा ‘झिरो डिस्चार्ज’ फ्लॅगशिप प्रकल्प
कोयनेचे पाणी दुष्काळी भागात वळवण्यावरून महायुतीतील काही नेत्यांनी व्यक्त केलेल्या विरोधावर बावनकुळे यांनी राज्य सरकारचे व्यापक जलधोरण स्पष्ट केले. राज्यातील कोयना प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प, नद्या आणि नाल्यांचे जे पाणी वाहून समुद्राला जाते, ते 100 टक्के पाणी थांबवून परत दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणे, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत महत्त्वाचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे. राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आणि राज्याचा जीडीपी (GDP) वाढवण्यासाठी ‘झिरो डिस्चार्ज’ (Zero Discharge) धोरणावर राज्य सरकार वेगाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
इंदापूरच्या तहसीलदारांची चौकशी करून कारवाई करू
राज्यातील इतर स्थानिक व राजकीय मुद्द्यांवरही बावनकुळे यांनी आपली भूमिका मांडली. इंदापूरचे तहसीलदार स्थानिक आमदार दत्तात्रय भरणे यांचेच ऐकतात आणि भाजप पदाधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत, या आरोपावरून भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला आहे. यावर बोलताना, “तहसीलदारांबद्दल खूप तक्रारी आल्या असून मी त्याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास निश्चित कारवाई करू,” असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा आंतरराष्ट्रीय विकास
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांसाठी मोठा निधी दिला असून राज्य सरकारने उड्डाणपूल उभारला आहे. येथील मेट्रो स्थानकाला ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’ नाव देण्याचा निर्णय घेतला असून, परिसरातील नजूल व महसूल खात्याची संपूर्ण जागा नगरविकास विभागाकडे वर्ग करून तिथली आरक्षणे नियमित करण्याचा निर्णय आपण घेतला असल्याचे स्थानिक आमदार या नात्याने बावनकुळे यांनी सांगितले.
राजीव गांधी हत्येच्या ब्रॉडकास्टवर आणि 5 कोटींच्या आरोपावर प्रतिक्रिया
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवेळच्या सुरक्षेबाबत एका ब्रॉडकास्टमध्ये करण्यात आलेल्या आरोपांवर बोलताना, “आता 20, 25 किंवा 30 वर्षांनंतर असे विषय काढून तत्कालीन सरकार आणि व्यक्तींबद्दल संभ्रम निर्माण करून नेमके काय साध्य करायचे आहे, हे मला कळत नाही,” असे ते म्हणाले. तसेच, ट्रेनिंग सेंटरसाठी 5 कोटी रुपये मागितल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपावर वस्तुस्थिती तपासूनच बोलता येईल, असे त्यांनी नमूद केले.
———————————–
हेही वाचा…
मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया: म्हणाल्या- गेली 12 वर्षे माझा शपथविधी होतोय, 2014 पासून मी मुख्यमंत्री होतेय; माझ्यावर अन्याय करू नका

संसदेतील लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) भाजपप्रणित ‘एनडीए’ (NDA) आघाडीत सामील होणार असल्याच्या आणि त्या बदल्यात खासदार सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांना राज्यात उधाण आले आहे. या सर्व तर्कवितर्कांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी (25 नोव्हेंबर) कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रीतीसंगमावर अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना पूर्णविराम लावला आहे. “गेली 12 वर्षे माझा शपथविधी होतोय आणि 2014 पासून मी मुख्यमंत्री होतेय, माझ्यावर अन्याय करू नका; मला या कुठल्याही कथांमध्ये रस नाही,” अशा शब्दांत त्यांनी या सर्व चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या निधनाला 28 तारखेला 10 महिने पूर्ण होत असल्याची भावुक आठवण काढली; तसेच राज्यातील भीषण दुष्काळ, उद्या मुंबईत होणारी आढावा बैठक, रोहित पवारांविषयीच्या चर्चा आणि गोकुळ दूध संघाच्या वादावरही रोखठोक भाष्य केले. येथे वाचा संपूर्ण बातमी