Headlines

‘जो बोले सो निहाल’च्या घोषात मनमाड शहरामध्ये दुचाकी रॅली:नगर कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय




गुरुनानक देवजी यांच्या ५५७ व्या प्रकाश पर्वानिमित्त मंगळवारी मनमाडमध्ये भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. ‘जो बोले सो निहाल, सत् श्री अकाल’च्या जयघोषात, ढोलाच्या गजरात आणि फडकणाऱ्या धर्मध्वजांच्या साक्षीने निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने शीख भाविक सहभागी झाले होते. यानिमित्त मनमाड छोटा गुरुद्वारा ते मोठा गुरुद्वारा गुरुनानक दरबारपर्यंत नगर कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू धन धन श्री गुरुनानक देवजी यांचा ५५७ वा प्रकाश पर्व अर्थात जन्मोत्सव मनमाड शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. मानवतावादावर दृढ श्रद्धा असलेल्या गुरुनानक देवजी यांनी जात-धर्माच्या पलीकडे जाऊन समता, बंधुभाव आणि एकतेची शिकवण दिली. तसेच देव, सत्य आणि सेवेचा संदेश दिला. त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त मनमाड गुरुद्वारात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अमृतसर आणि नांदेडनंतर भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे ऐतिहासिक व पवित्र गुरुद्वारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड गुरुद्वारात आयोजित कार्यक्रमांसाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने शीख भाविक, यात्रेकरू आणि संगत दाखल झाली होती. त्यामुळे गुरुद्वारा परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळी मनमाड गुरुद्वारापासून भव्य प्रबोधनपर दुचाकी रॅली काढण्यात आली.रॅलीत श्री गुरुनानक देवजी यांची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती. शहरातील विविध ठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले.तसेच मनमाड छोटा गुरुद्वारा ते मोठा गुरुद्वारा गुरुनानक दरबारपर्यंत शोभायात्रा अर्थात नगर कीर्तन प्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत पंचप्यारे, निशाण आणि गुरु ग्रंथसाहिब सहभागी झाले होते. मध्यरात्री नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मंगळवारी सकाळी गुरुद्वारात अरदास आणि गुरुवाणीने विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला. जन्मोत्सवानिमित्त मनमाड गुरुद्वारात आकर्षक सजावट आणि भव्य रोषणाई करण्यात आली होती. रात्रीच्या अंधारात रोषणाईने गुरुद्वारा परिसर उजळून निघाला होता. सकाळपासून गुरुद्वारात गुरुवाणी भजन, कीर्तन, अरदास, प्रार्थना, अखंड पाठ समाप्ती आणि लंगर अर्थात महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले. या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होऊन माथा टेकवला आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *