![]()
सुरक्षित मातृत्व, आईचे आरोग्य आणि बाळाची सुरक्षितता याबाबत जनजागृती करण्यासाठी अहिल्यानगरमध्ये ३४० नर्सिंग विद्यार्थी व प्राध्यापक रस्त्यावर उतरले. नैसर्गिक प्रसूतीचे महत्त्व, सिझेरियनची वैद्यकीय गरज आणि सन्मानपूर्वक मातृत्व काळजीचा संदेश देत शहरातून
.
‘सोसायटी ऑफ मिडवाइफ इंडिया’ (SOMI) यांच्या राष्ट्रव्यापी वॉकथॉन मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे कॉलेज ऑफ नर्सिंग आणि रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत प्रोफेसर चौक येथे रॅलीचा समारोप झाला.
वैद्यकीयदृष्ट्या आवश्यकता नसताना केवळ पर्याय म्हणून सिझेरियनचा अवलंब होऊ नये, हा मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. मात्र, आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असेल तेव्हा सिझेरियन ही महत्त्वाची वैद्यकीय प्रक्रिया असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. गर्भवती महिलांना योग्य वैद्यकीय सल्ला, भावनिक आधार आणि सन्मानपूर्वक प्रसूती काळजी मिळणे आवश्यक असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी फलक व घोषणांद्वारे दिला.
यावेळी स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र संघटनेच्या अहिल्यानगर शाखेच्या सचिव डॉ. नीलम बागल यांनी मार्गदर्शन केले. सुदृढ मातृत्वाची तयारी किशोरवयापासूनच सुरू व्हावी. मुली व महिलांनी आहारात कॅल्शियम आणि लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा, असे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय संचालक प्रा. डॉ. अभिजित दिवटे यांचे मार्गदर्शन लाभले. रोटरी क्लबचे अध्यक्ष अमर गुरव उपस्थित होते. प्राचार्या डॉ. प्रतिभा ए. चांदेकर व उपप्राचार्या डॉ. योगिता औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. नीलिमा जगताप, रेबेका साळवे व नम्रता शिंदे यांनी परिश्रम घेतले.