![]()
प्रेमविवाह करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेचा जात वेगळी असल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. तू आमच्या जातीची नाहीस, असे टोमणे मारत विवाहितेची इच्छा नसताना तिचा तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अमानुष प्रकरणामुळे नाशिक परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेल्यानंतर तिच्या वेगळ्या जातीवरून सासरच्या लोकांनी छळ सुरू केला. महिलेला गर्भधारणा झाल्यानंतर, तू आमच्या जातीची नाहीस, त्यामुळे तुझ्या मुलांना आम्ही स्वीकारणार नाही, अशी भूमिका सासूने घेतली. त्यानंतर सासरच्या लोकांकडून सतत मानसिक दबाव आणून आणि शारीरिक छळ करून विवाहितेचा एक-दोनदा नव्हे, तर तब्बल आठ वेळा गर्भपात घडवून आणण्यात आला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. वेडी ठरवत रुग्णालयात दाखल करण्याची धमकी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सासू-सासऱ्यांकडून तिला सतत शिवीगाळ व हिन वागणूक दिली जात होती. एवढेच नव्हे तर, तुला वेडी ठरवून मानसिक रुग्णालयात भरती करू, अशी धमकीही तिला सातत्याने दिली जात होती. पीडित महिला आणि तिचा पती सुरुवातीला पुण्यात नोकरी निमित्त राहत होते. मात्र, तिथली नोकरी सुटल्यानंतर जुलै 2025 मध्ये ती नाशिकला परतली. नाशिकमध्ये आल्यानंतर सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाचे प्रमाण अधिकच वाढले. घरासाठी माहेरून पैसे आण म्हणत छळ या शारीरिक आणि मानसिक छळासोबतच विवाहितेची मोठी आर्थिक फसवणूकही करण्यात आली. नाशिकमध्ये स्वतःचे घर खरेदी करायचे आहे, असे सांगून पतीने विवाहितेचे सोन्या-चांदीचे दागिने मोडून पैसे हडप केले. त्यानंतरही माहेरून आणखी पैसे आणि हुंडा आणण्यासाठी तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता. केवळ जात वेगळी असल्याच्या कारणावरून तिला घरात आणि समाजात सन्मानाने जगू दिले जात नव्हते, असे पीडितेने पोलिसांना सांगितले.
Source link
नाशिकमध्ये आंतरजातीय विवाहानंतर विवाहितेचा छळ:8 वेळा गर्भपात घडवला, पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल