Headlines

नाशिक कुंभमेळ्याच्या रस्ते कामांत हजारो कोटींचा घोटाळा- अनिल परब:दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा




नाशिकमधील २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते विकासकामांमध्ये सरकारी नियम धाब्यावर बसवून अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांची ‘रिंग’ तयार केली असून यात हजारो कोटी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र लुटत आहात, पण किमान देवाला तरी सोडा, असा घणाघाती आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी केला. विधान परिषदेत नियम २६० च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी पुराव्यांसह कागदपत्रे सादर करत या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आक्रमक मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली. अनिल परब यांनी सभागृहात नाशिक कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेची जंत्रीच सादर केली. एकट्या नाशिक जिल्ह्यासाठी २२७० कोटी रुपयांची रस्त्यांचे टेंडर्स काढण्यात आले आहेत. मुख्य अभियंता प्रशांत अवटी आणि ‘हर कन्स्ट्रक्शन’चे विलास बिरारी यांनी मिळून १६ कंपन्यांची ‘रिंग’ तयार केल्याचा आरोप परब यांनी केला. २०१८ च्या सरकारी जीआरनुसार, एखादा कंत्राटदार एका निविदेत पात्र ठरला, तर त्याला दुसऱ्या निविदेत अपात्र ठरवता येत नाही. मात्र, मर्जीतील कंत्राटदारांना कामे देण्यासाठी या अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवले. कामे पूर्णही नाहीत, रस्त्यांना गेले तडे “अजून कामे पूर्णही झालेली नाहीत तोवर रस्त्यांना तडे गेले आहेत. आणखी १३०० कोटींचे रस्त्यांचे टेंडर येणे बाकी आहे, हा भ्रष्टाचार वेळीच रोखणे गरजेचे आहे. ज्यांना रस्त्याच्या कामात संधी मिळाली नाही त्यांना रिंगरोडच्या टेंडरमध्ये संधी दिली गेली, असा आरोप परब यांनी केला.परब यांनी मुंबई महानगरपालिकेतील निधी वाटपातील दुजाभावावरून अनिल परब यांनी सरकार आणि पालिका प्रशासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. मुंबईत ठाकरे गटाचे ६५ माजी नगरसेवक असून त्यांच्या वॉर्डातील विकासकामांसाठी केवळ २५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. याउलट भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांना अडीच कोटींपासून ते थेट १५ कोटी रुपयांपर्यंत खिरापत वाटण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच शहरात सुरू असलेल्या अनेक कामांत मोठा घोटाळा होत असल्याचेही ते म्हणाले. अशी उघडी पाडली ‘पात्र-अपात्रते’ची साखळी
3 फॉरकॉन इन्फ्रा: ३६.४० कोटींच्या कामामध्ये पात्र, तर २६ कोटींच्या कामात ठरले अपात्र.
2 बी. आर. भदाने बीकॉन कंपनी : ३४.५ कोटींच्या कामात पात्र, तर २६.१९ कोटींच्या कामात अपात्र.
1 एस. एम. अवताडे कंपनी : १३१.७३ कोटींच्या कामात पात्र, तर ७३.२७ कोटींच्या कामात हेतुपुरस्सर अपात्र. आरोपांची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले नाशिक कुंभमेळ्याच्या निविदा (टेंडर) प्रक्रियेबाबत करण्यात आलेल्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधान परिषदेत दिले. भोसले म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठी ऑनलाइन निविदा मागवण्यात आल्या आहेत. असे असूनही सभागृहात करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल. कुंभमेळ्यासाठी बनवल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या दर्जाच्या तपासणीसाठी चार स्तरांवर चौकशी केली जात असल्याचेही भोसले यांनी या वेळी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *