![]()
नाशिक येथील टीसीएस कंपनीतील बहुचर्चित लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला अखेर गुरुवारी (७ मे) छत्रपती संभाजीनगरातील नारेगावातून अटक करण्यात आली आहे. २ मे रोजी नाशिक न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या. गुरुवारी (७ मे) रात्री ८ वाजेच्या सुमारास नारेगाव परिसरातील कौसर पार्क येथील एका नातेवाइकाच्या फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली. निदा ही तिच्या आई-वडिलासंह तेथे राहत होती. दरम्यान, या कारवाईसाठी पोलिसांनी खाकी वर्दी, पोलिस वाहन वापरणे टाळले हे विशेष. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मुंबईतून स्थानिक पातळीवर सतत अपडेट्स घेत होते. निदा खान हिच्यावर धार्मिक भावना दुखावणे, बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत करणे तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे गंभीर आरोप आहेत. तपासादरम्यान निदा खान छत्रपती संभाजीनगरात लपून बसल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली आणि तांत्रिक विश्लेषणातून ती नारेगाव परिसरात वास्तव्यास असल्याचे समोर आले. मुंबईवरून घेतले जात होते अपडेट्स; उशिरापर्यंत व्हीसी प्रकरण कॉर्पोरेट जिहादशी संबंधित असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक पातळीवर सातत्याने माहिती घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची याबाबत रात्री उशिरापर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू होती. कुणाकडे लपली होती निदा? निदा खान नारेगावातील कौसर कॉलनीमध्ये एका नातेवाइकाच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास होती. अटक टाळण्यासाठी ती गेल्या ३ ते ४ दिवसांपासून आई, वडील, भाऊ, मावशीसह लपून बसली होती. तिच्या सोबत अजून ५ जण असल्याची माहिती आहे. नाशिकहून ती इकडे असल्याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. शहरातील वकिलांच्या संपर्कात निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील काही वकिलांच्या कायदेशीर सल्ल्यासाठी संपर्कात होती. हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करण्याची तयारी सुरू असतानाच पोलिसांनी ‘पॅरलल इन्व्हेस्टिगेशन’ राबवून तिला ताब्यात घेतले. आरोपी दानिश शेख याच्या मोबाइलमधील संशयास्पद फोटो आणि व्हिडिओ हे निदापर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे तांत्रिक पुरावे ठरले. मागील चार दिवसांपासून संभाजीनगर आयुक्त आणि नाशिक आयुक्त संपर्कात होते. दोन दिवस नाशिकची टीम नारेगावात होती. रात्रीतून नेले न्यायाधीशांच्या घरी अटकेनंतर निदा खानला गुरुवारी रात्री उशिरा सूतगिरणी चौकातील न्यायाधीशांच्या निवासस्थानी हजर करण्यात आले. नाशिक पोलिसांनी तिचा ट्रान्झिट रिमांड मिळवला असून तिला पुढील तपासासाठी विशेष गाडीने नाशिककडे रवाना करण्यात आले आहे. या वेळी दहा सेकंदात गाडी बदलली. ठाण्यात दंगाकाबू पथक तैनात शहरात धार्मिक वाद उफाळण्याची चिन्हे होती, त्यामुळे पोलिस ठाण्याबाहेर दंगा काबू पथक तैनात करण्यात आले होते. गल्लीतील कुणालाही कारवाईची माहिती मिळणार नाही याची काळजी घेतली. नाशिकच्या पथकासह पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, निरीक्षक गजानन कल्याणकर आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. दानिश शेखच्या मोबाइलमधील डेटा अन् चॅट्सचा तांत्रिक तपास महत्त्वाचा 1 नाशिकच्या कॉर्पोरेट क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या या ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटले आहेत. निदा खानच्या अटकेमुळे या रॅकेटचे धागेदोरे संभाजीनगरपर्यंत येऊन पोहोचले आहेत. यात आणखी कुणाचा सहभाग आहे, हे समोर येण्याची शक्यता आहे. 2 २ मे रोजी नाशिक न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला, हा या तपासातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. जामीन फेटाळल्यानंतर आरोपी अधिक सतर्क झाली होती आणि तिने आपले लपण्याचे ठिकाण वारंवार बदलण्यास सुरुवात केली होती. 3 धर्मांतरासारख्या संवेदनशील विषयात डिजिटल पुराव्यांचा वापर तपास यंत्रणांसाठी महत्त्वाची ठरला. मुख्य आरोपी दानिश शेख याच्या मोबाइलमधील डेटा आणि चॅट्सचा तांत्रिक अभ्यास केल्यामुळेच पोलिसांना निदा खानपर्यंत पोहोचता आले. 4 तिने लपण्यासाठी शहराची निवड केली कारण तिचे काही नातेवाईक नारेगाव परिसरात वास्तव्यास होते. तसेच, हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करण्याच्या हेतूने ती शहरातील काही वकिलांच्या कायदेशीर सल्ल्यासाठी संपर्कात होती. 5 धार्मिक बाबींशी संबंधित असल्यामुळे पोलिसांनी दिवसभर कमालीची गुप्तता पाळली. तणाव टाळण्यासाठी तिला न्यायालयात न नेता थेट न्यायाधीशांच्या निवासस्थानी हजर करून रिमांड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
Source link
निदाच्या अटकेसाठी पोलिसांनी वर्दी, शासकीय वाहन टाळले:न्यायाधीशांच्या घरून घेतला ट्रांझिट रिमांड, नाशिकला जाताना बदलली गाडी