![]()
ज्याप्रमाणे भगवंत प्राप्तीसाठी संतसंगतीची गरज असते, त्यापेक्षाही जास्त निर्मळ मनाची सर्वप्रथम गरज असते. निर्मल स्वच्छ व मनाच्याद्वारे भगवंताची प्राप्ती होऊ शकते. ज्याचे मन सरळ व प्रामाणिक असते, त्याला भगवंत सर्वात आधी प्रसन्न होतात, अशा निर्मळ मनाची कामना प्रत्येकाने करावी, असा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार राजेशकृष्ण महाराज यांनी केला. माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त स्थानिक माहेश्वरी भवन येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञात राजेशकृष्ण महाराज यांनी भागवत कथेचे पंचम पुष्प गुंफले. गोवर्धननाथांची कथा प्रतिपादित करताना त्यांनी कृष्णाच्या बाललीलाची थोरवी गायली. ते म्हणाले, वृंदावन हे प्रेमाचे प्रतीक आहे. ते स्वतः नारायण यांनी वसविले आहे. भक्तासाठी वृंदावनची निर्मिती भगवंतांनी केली आहे. वृंदावन अनेक प्रकारचे असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये आर्य वृंदावन, स्वरूप वृंदावन, निज वृंदावन, धाम वृंदावन, नित्यलीला वृंदावन आदी वृंदावनचे प्रकार असून, नित्य लीला वृंदावनमध्ये साक्षात श्रीकृष्ण विराजमान असतात, असे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, आज वृंदावन आपल्या जुन्याच अवस्थेत असून, तेथील नागरी व्यवस्था सुचारू व सुरळीत झाली पाहिजे. त्याचप्रमाणे परिसरातील यमुना नदी निर्माल्य व कचऱ्यांनी भरलेली आहे. दिल्लीपासून येत असलेली ही नदी घाण व कचऱ्याने माखत चालली असून, तिचे ही शुद्धीकरण झाले पाहिजे. त्याचप्रमाणे गोमाता ही राष्ट्रमाता झाली पाहिजे, यासाठी ही समाजाने जागरूक राहण्यावर ही त्यांनी भर दिला. कथेचे संचालन आरती जाजू यांनी केले. या भागवत कथेत महारास, उद्धव गोपी संवाद व रुक्मिणी विवाह झाकी समवेत फुलांची होळी सादर करण्यात येणार आहे. माहेश्वरी सुंदरकांड समितीच्या वतीने सुंदरकांड सादर करण्यात येणार आहे. रविवार ३१ मे रोजी सकाळी ९ वाजता सुदामा चरित्र व परीक्षित मोक्ष कथेच्या माध्यमातून कथेची पूर्णाहुती होणार आहे. सुदामा मिलनाची उत्कृष्ट झाकी यावेळी सादर करण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता होम हवन होऊन कथेची भक्तिभावात सांगता होणार आहे. या कथा उत्सवाचा सर्व महिला-पुरुष भक्तानी मोठया संख्येने लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष वंदना हेडा, सचिव शोभा बियाणी, उपाध्यक्ष मंजू गट्टानी, आरती जाजू, सहसचिव सुनीता हेडा, राधा टावरी, कोषाध्यक्ष अनिता गांधी, सल्लागार हेमा खटोड, शिल्पा चांडक, महिला मंडळाच्या पदाधिकारी आदींसह सदस्यांनी केले. भक्तांनी अन्नाची नासाडी करून नये या सत्रात महाराजांनी भोजनाच्या नासाडीवरही आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. अन्नाचा कण व संतांचा संग हा फार मेहनतीने व प्रयत्नांनी आपणास प्राप्त होतो. म्हणून भक्तांनी अन्नाची नासाडी न करता पाहिजे तेवढेच अन्नग्रहण करून अन्नपूर्णेला प्रसन्न करावे. भूक नसतानाही खाणारे अनेक महाभाग असून ते आपल्या ताटात जास्त भोजन घेऊन अन्नाची नासाडी करतात. यावर आवर घातला गेला पाहिजे व अन्नाची नासाडी थांबवल्या गेली पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असले त्यांनी सांगितले.
Source link
निर्मल मनाद्वारे भगवंताची प्राप्ती- राजेशकृष्ण महाराज:माहेश्वरी महिला मंडळातर्फे पुरुषोत्तम मासानिमित्त श्रीमद् कथा