![]()
अमरावती विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारी अर्ज बाद ठरवल्यानंतर बाजोरिया पिता-पुत्रांविरुद्ध निवडणूक अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी संतोष काकडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली. मंगळवारी (२ जून) सकाळी ११ वाजल्यापासून महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्रांची छाननी सुरू होती. जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख आणि विधी अधिकारी नरेंद्र बोहरा उपस्थित होते. छाननी प्रक्रियेत विप्लव बाजोरिया यांच्या नामनिर्देशन पत्रावर आक्षेप घेण्यात आला. या आक्षेपावर सुनावणी घेतल्यानंतर जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला. या निर्णयानंतर काही वेळाने विप्लव बाजोरिया, त्यांचे वडील गोपीकिशन बाजोरिया आणि इतर काही व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यांनी निर्णयाची प्रत तात्काळ देण्याची मागणी करत कार्यालयात गोंधळ निर्माण केला. अधिकाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि प्रत तयार झाल्यावर देण्याचे सांगितले. मात्र, गोपीकिशन बाजोरिया ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मोठ्या आवाजात आणि अर्वाच्य भाषेत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने तसेच तेथे उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली. त्यांनी हक्कभंग दाखल करण्याची धमकी देत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. या घटनेचे रेकॉर्डिंग असलेला पेनड्राइव्ह तक्रारीसोबत सादर करण्यात आला आहे.
Source link
निवडणूक अधिकाऱ्यांना शिवीगाळ, बाजोरिया पिता-पुत्रांवर गुन्हा:उमेदवारी अर्ज बाद झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांशी वाद