![]()
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळावे, अशी अपेक्षा असताना तेल्हारा नगरपरिषदेच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्ञानपीठ प्राथमिक शाळा क्रमांक १ मधील अस्वच्छतेने प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी केलेल्या पाहणीत शाळेच्या परिसरात अस्वच्छतेचे चित्र समोर आले. शाळेच्या वर्गखोल्यांच्या परिसरात देशी- विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, वाढलेले गवत, साचलेले पाणी, अस्वच्छ शौचालये व मैदानात कचरा आणि शेण आढळल्याचे पालकांचे म्हणणे आहे. नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी व साचलेल्या पाण्याची समस्या निर्माण होत असल्याची तक्रार पालकांनी केली. एका बाजूला शाळांमध्ये स्वच्छता व सुरक्षिततेबाबत प्रशासनाकडून विविध दावे केले जात असताना दुसऱ्या बाजूला नगरपरिषदेच्या शाळेत अशी परिस्थिती दिसत असल्यास स्वच्छतेच्या व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी कोण करणार व जबाबदारी कोण घेणार? असा सवाल पालकांमधून उपस्थित होत आहे. आता आश्वासनांपलीकडे जाऊन शाळेची प्रत्यक्ष स्वच्छता, सुरक्षित पाणीपुरवठा आणि नियमित देखभाल सुरू होते का, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. शाळेच्या आवारातच मोकाट जनावरांचा वावर गंभीर बाब म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीतही कचरा आढळल्याचा दावा करण्यात आला. शाळेच्या आवारात मोकाट जनावरांचा वावर असल्याने मैदानात शेण साचत असल्याचेही पाहणीत निदर्शनास आले. पालकांचा आंदोलन करण्याचा इशारा पालक विनोद वाघ, सूरज साळुंके, सुनील हिवराळे, दिनेश सोळंके, गोपाल सोळंके, सामाजिक कार्यकर्ते गौरव धुळे यांनी शाळेतील परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवावेत, पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करावी, शौचालये व नाल्यांची नियमित साफसफाई करावी, मैदानातील कचरा व शेण हटवावे आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. बाटल्यांमुळे विद्येचे घर की दारुचा अड्डा ^शेतकरी व शेतमजुरांच्या मुलांनी या शाळेत सुरक्षित वातावरणात शिक्षण घ्यावे, ही पालकांची अपेक्षा आहे. मात्र शाळेच्या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्याने ‘विद्येचे घर’ की दारूचा अड्डा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.- -गौरव धुळे, सामाजिक कार्यकर्ते. नियमित स्वच्छतेची व्यवस्था करणार ^शालेय परिसरातील समस्यांची पाहणी केली आहे. शाळेतील विविध समस्यांच्या निराकरणासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील. नियमित स्वच्छतेची व्यवस्था करण्यात येणार आहे. – दीपक बांगर, स्वच्छता विभाग, नगरपरिषद, तेल्हारा.
Source link
न.प. शाळेत अस्वच्छता; परिसरात मद्याच्या बाटल्या:टाकीत कचरा, दुर्गंधीयुक्त शौचालये, मैदानात शेण तसेच वाढलेले गवत