Headlines

पक्षांतर्गत वाद:गरब्यामध्ये प्रवेशासाठी टिळा सक्तीवरून भाजप आमदारांचा परस्परविरोधी ‘दांडिया’, उपाध्यायांची सनातनी चौकट, तर दरेकरांचा सर्वसमावेशकचा सूर




नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियामध्ये टिळा लावून प्रवेशावरून भाजपतच परस्परविरोधी भूमिका घेण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने गरबामध्ये गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी, ओळखपत्राची पडताळणी आणि कपाळावर टिळा लावण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. त्याला बोरिवलीचे स्थानिक भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी सनातनी संस्कृतीचे पावित्र्य आणि महिला सुरक्षेचा दाखला देत जाहीर पाठिंबा दर्शवला. तर बोरिवली पश्चिम येथील ‘रंग रास नवरात्री’चे मुख्य आयोजक आणि विधान परिषदेचे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी बुधवारी सर्वसमावेशकतेचा निकष मांडला. “उत्सवात जात-पात नसते; जे राष्ट्रवादी विचारांचे आहेत आणि या मातीवर प्रेम करतात, ते कोणत्याही धर्माचे असले तरी आपलेच आहेत,” असे स्पष्ट करत त्यांनी विशिष्ट समुदायावर बंदी घालण्यास नकार दिला. टिळा लावून प्रवेशाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही सर्वसमावेशक भूमिका मांडली होती. परस्परविरोधातही राजकीय गणिते आमदार संजय उपाध्याय बोरिवलीतील स्थानिक पारंपरिक मतदार आणि संघ परिवारातील संघटनांच्या धार्मिक भावनांचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांची भूमिका सनातनी चौकटीला प्राधान्य देणारी आहे. तर दरेकरांनी मांडलेली ‘राष्ट्रभक्ती’ची चौकट आणि काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलेला ‘सांस्कृतिक सौहार्दा’चा दृष्टिकोन मुंबईसारख्या महानगरात सर्व घटकांना सामावून घेणारा असून, यामुळे पक्षाची प्रतिमा सर्वसमावेशक राहण्यास मदत होते. यातून पारंपरिक हिंदुत्ववादी मतदार आणि सर्वसमावेशक मध्यमवर्गीय शहरी वर्ग या दोघांची मतपेढी राखण्याचे राजकीय गणित स्पष्ट दिसते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *