Headlines

पतीची इच्छा पत्नीने केली पूर्ण; तिघांना नवजीवन:‘माझ्या जीवाला काही झाले, तर अवयव दान करा, हयात असताना मडावी यांनी व्यक्त केली इच्छा‎




मृत्यूच्या दुःखद प्रसंगालाही माणुसकीची किनार देत सहाय्यक शिक्षक किशोर मडावी यांच्या अवयवांचे दान करण्यात आले. त्यांच्या अवयवांमुळे तीन गरजू रुग्णांवर प्रत्यारोपणाची प्रक्रिया करण्यात आली. पतीने काही काळापूर्वी व्यक्त केलेली अवयवदानाची इच्छा लक्षात ठेवत पत्नी ज्योती मडावी यांनी दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तीन कुटुंबांना नव्या आयुष्याची आशा मिळाली. इंझाळा पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या किशोर मडावी यांचा दि. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तनिष्क ज्वेलर्सजवळ दुर्दैवी अपघात झाला. दुचाकीने रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला. मात्र, या कठीण प्रसंगीही पत्नी ज्योती यांनी पतीची इच्छा आठवून अवयवदानास संमती दिली. ‘माझ्या जीवाला भविष्यात काही झाले, तर माझे अवयव दान करावेत,’ अशी इच्छा किशोर मडावी यांनी यापूर्वी पत्नीशी बोलताना व्यक्त केली होती. पतीची ही अखेरची इच्छा पत्नीने अश्रूंना आवर घालत पूर्ण केली. वैद्यकीय प्रक्रियेनंतर किशोर मडावी यांच्या अवयवांचे दान करण्यात आले. त्यांच्या अवयवांमुळे तीन गरजू रुग्णांना नवजीवनाची संधी मिळाली. एका कुटुंबाने आपला आधार गमावला. मडावी कुटुंबाच्या निर्णयामुळे तीन कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला. किशोर मडावी हे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. अध्यापनाच्या जबाबदारीसोबतच ते सामाजिक कार्यातही सक्रिय सहभागी होत. विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याने वागणारे शिक्षक म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. सामाजिक उपक्रमांत ते पुढाकार घेत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ९ ऑगस्ट रविवारी घाटंजी येथील मोक्षधामावर शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी शिक्षक, परिचितांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला. मनावर दगड ठेवून अवयवदानाला संमती आम्हाला सोडून गेले, हे दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. माझ्या जीवाला काही झाले तर माझे अवयव दान करा. त्यांच्या शेवटच्या इच्छेपेक्षा माझ्यासाठी मोठे काहीच नव्हते. मनावर दगड ठेवून मी अवयवदानाला संमती दिली. आज ते आमच्यात नसले तरी त्यांच्या अवयवांमुळे तीन जणांना नवजीवनाची संधी मिळाली. त्यांच्या जाण्याने तीन कुटुंबांना जगण्याची आशा मिळाली. हीच त्यांच्या आठवणीला खरी श्रद्धांजली आहे.- ज्योती किशोर मडावी , (पत्नी)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *