![]()
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) विरोधात शरद पवार गटाने धाराशिवचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि परभणीचे उद्धवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांचे बंधू डॉ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांना भरलेला अर्ज मागे घ्यावा लागणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान, महायुतीकडून सतीश चव्हाण चौथ्यांदा रिंगणात उतरले असून, त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा कोण, याबाबत गेल्या काही दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात होते. सुरुवातीला उद्धवसेनेने उमेदवार जाहीर केला असला तरी काँग्रेस व शरद पवार गटाची त्यास संमती नव्हती. अखेर दोन दिवसांपूर्वी प्रताप पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ‘राष्ट्रवादी’च्या दाव्यानुसार त्यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांनी मतदारसंघात प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यासही सुरुवात केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील नेते निवडणुकीस समोरासमोर निवडणुकीतील सर्वात रंजक बाब म्हणजे दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्धी मूळचे धाराशिव जिल्ह्यातीलच आहेत आणि दोघेही मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. सतीश चव्हाण आणि डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यातील या लढतीमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. डॉ. प्रतापसिंह पाटील हे परभणी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू स्व. वेदप्रकाश पाटील यांचे पुत्र असून परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांचे सख्खे बंधू आहेत. विशेष म्हणजे, आमदार डॉ . पाटील हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. २ दिवसांत अंतिम निर्णय महाविकास आघाडीत जागेबाबत वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू आहे. आम्ही आमचा प्रचार सुरू केला आहे, तरीही येत्या दोन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. – अंबादास दानवे, आमदार, उद्धवसेना आम्ही काम सुरू केले पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आदेश दिला, त्यानुसार आम्ही काम सुरू केले आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र मिळून ही लढाई लढणार आहेत. – डॉ. प्रतापसिंह पाटील, शरद पवार गट दोन्ही उमेदवारांमागे शिक्षण संस्थांचे नेटवर्क विधान परिषदेची ही जागा मुळात राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याने शरद पवार गटाने महाविकास आघाडीत यावर ठाम दावा केला होता. विद्यमान आमदार राष्ट्रवादीचेच असल्याने अखेर ही उमेदवारी प्रताप पाटील यांच्या पदरात पडली. सतीश चव्हाण हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असल्याने संपूर्ण मराठवाड्यात त्यांची मजबूत पकड आहे. तर दुसरीकडे, डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे स्वतःचे धनेश्वरी शिक्षण प्रसार मंडळाचे जाळे आणि जालन्यात माजी मंत्री राजेश टोपे यांच्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेची मिळणारी ताकद यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याचा अंदाज आहे.
Source link
‘पदवीधर’च्या रिंगणात आता ‘राष्ट्रवादी’ विरुद्ध ‘राष्ट्रवादी’:महायुतीच्या चव्हाणांविरोधात मविआकडून प्रताप पाटील