![]()
परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी ता. १७ जाहीर होणार असून संचालकांच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. दोन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेच्या निवडणूकीमुळे सहकार क्षेत्राचे वातावरण तापणार आहे. परभणी व हिंगोली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांचा निवडणूकीचा कार्यक्रम बुधवारी प्रसिद्ध होणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा विशेष लेखा परिक्षक सहकारी संस्था सुरेश काकडे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. संचालकांच्या २१ जागांसाठी होणाऱ्या या निवडणूकीमध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून १४, कृषी पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया संस्थेतून १, इतर शेती संस्था १, राखीव प्रवगांतर्गत अनुसूचित जाती-जमातीसाठी १, इतर मागासवर्गासाठी १, भटक्या विमुक्त जाती व जमातीसाठी किंवा विशेष मागास प्रवर्ग गटातून १ तर महिला प्रतिनिधींसाठी राखीव प्रवर्गातील २ संचालकांचा समावेश आहे. या निवडणूकीची अधिसूचना ता. १७ जून रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. ता. १७ जून ते ता. २३ जून पर्यंत सकाळी आकरा ते दुपारी तीन यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ता. २४ जून रोजी उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार असून ता. २५ जून रोजी सकाळी आकरा वाजता पात्र उमेदवारी अर्जाची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ता. २५ जून ते ता. ९ जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ता. १० जुलै रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप होणार असून त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. ता.१९ जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी चार यावेळेत मतदान घेतले जाणार आहे. ता. २० जुलै रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतरच लगेचच निवडणूक निकाल जाहीर केला जाणार आहे. मतदान व मतमोजणीचे ठिकाण नंतर जाहीर केले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. या निवडणुकीमुळे आता दोन्ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे वातावरण तापणार आहे.
Source link
परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक:बुधवारी कार्यक्रम जाहीर होणार, संचालकांच्या 21 जागांसाठी निवडणूक