Headlines

पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज:पालकमंत्री विखे यांचे प्रतिपादन, डिजिटल ग्रंथालय लोणी-हसनापूर परिसरासाठी मानबिंदू ठरणार‎




भविष्यातील वाढते जलदुर्भिक्ष लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने, विशेषतः वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी, पाण्याचा नियोजनबद्ध व काटकसरीने वापर करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी येथे केले. लोणी (हसनापूर) येथे नवनिर्मित आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व जिल्हा ग्रंथालयाच्या डिजिटल उपकेंद्राच्या इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त स्वप्निल साबळे, राजूर प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, राज्यातील तिसरे डिजिटल ग्रंथालय उपकेंद्र लोणी-हसनापूर परिसरासाठी मानबिंदू ठरणार असून, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरेल. या आधुनिक इमारतीसाठी जिल्हा नियोजन मंडळातून ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, येथे दूरदृश्य प्रणालीसह विविध अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत. सध्या पावसाअभावी धरणे रिकामी होत चालल्याने पिण्याच्या पाण्याचे नियोजन सप्टेंबरपर्यंत वाढवावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा पुनर्वापर वाढविण्यासाठी या इमारतीत जलपुनर्वापर व सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. वसतिगृहांमध्ये पाण्याचा अपव्यय व तोडफोडीच्या प्रवृत्तींना आळा बसला पाहिजे. ही मालमत्ता जनतेच्या पैशातून उभारलेली असल्याने ती जनतेचीच संपत्ती आहे, असे सांगत पालकमंत्र्यांनी प्रशासनालाही खडे बोल सुनावले. विद्यार्थ्यांच्या समस्या वेळेवर सोडवल्यास त्यांच्यावर संप करण्याची किंवा ‘लाँग मार्च’ काढण्याची वेळ येणार नाही. प्रशासन संवेदनशील राहिल्यास विद्यार्थीही सहकार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच येथे ५०० क्षमतेचे सभागृह व सुसज्ज व्यायामशाळा उभारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर म्हणाले, जिल्ह्यात शतकोत्तर परंपरा असलेली सुमारे ४८० ग्रंथालये आहेत. येथील वाचन चळवळ अतिशय गतिमान आहे. प्रास्ताविकात देवकन्या बोकडे म्हणाल्या की, आदिवासी मुलांच्या या शासकीय वसतिगृहाची प्रवेश क्षमता ७५ वरून १५० विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्यात आली असून, प्रत्येक मजल्यावर अभ्यासिका व निवासासाठी आवश्यक सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *