![]()
गणेशोत्सवानिमित्त देखावे पाहून घरी जात असलेल्या तरुणावर धारदार चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील खरवंडी कासार येथे गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. भाऊसाहेब काकासाहेब जायगुडे (वय २८) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी आकाश नामदेव ढगे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. खरवंडी येथील मारुती मंदिराजवळ गणेशोत्सवानिमित्त गुरुवारी रात्री गणेश मंडळाच्यावतीने आरास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास आकाश ढगे हे आरस पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे आतेभाऊ भाऊसाहेब जायगुडे हे देखील तेथे आले होते. दरम्यान, काही वेळाने एक व्यक्ती मंदिराच्या मागील बाजूने गणेश मंडळासमोर आला. त्याच्या अंगावर रक्ताचे डाग असून हातात रक्ताने माखलेला चाकू असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आले. त्याने भाऊसाहेब जायगुडे यांना चाकूने जखमी केल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यानंतर आकाश ढगे व इतरांनी मंदिराच्या मागील बाजूस जाऊन पाहिले असता भाऊसाहेब जायगुडे गंभीर जखमी अवस्थेत खाली पडलेले दिसले. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे, पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवानाथ दहिफळे, बाबासाहेब बडे, ज्ञानेश्वर इलग, निलेश गुंड, इजाज सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली.
Source link
पाथर्डी:तरुणावर धारदार चाकूने हल्ला; संशयित ताब्यात